मुख्यमंत्री बोम्माई ः हिंदी दिवसला निजदचा विधानसभेत आक्षेप
प्रतिनिधी / बेंगळूर
निजदसह काही संघटनांकडून राज्यात हिंदी दिवस साजरा करण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे. विधानसभेतही बुधवारी याचे पडसाद उमटले. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यात कन्नड सक्तीसाठी नवा कायदा जारी करण्यात येणार आहे. या अधिवेशनातच यासंबंधीचे विधेयक मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे इतर भाषिकांवर कायद्याद्वारे कन्नड भाषा लादण्यासाठी सरकारने प्रयत्न चालविले आहेत.
राज्य सरकारने राज्यातील अन्य भाषिकांवर कन्नड भाषा लादण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. बुधवारी विधानसभेत निजदच्या आमदारांनी हिंदी दिवस साजरा करण्यास आणि हिंदीविरोधात मुद्दा उपस्थित केला. राज्यात हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याची भाषा कन्नड असताना हिंदी भाषा दिवस साजरा करण्याची गरजच काय?, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कन्नडसक्तीसाठी नवा कायदा जारी करण्यात येईल. आतापर्यंत कन्नड भाषा सक्तीची असल्याचे सांगत आलो आहे. कन्नड सक्तीसाठी अनेक प्राधिकरण, समित्या आहेत. मात्र, त्यासाठी नियमबद्ध अधिकारी नाहीत. त्यामुळे कन्नडला कायद्याचे संरक्षण देण्यासाठी नवा कायदा जारी करण्यात येईल. या अधिवेशनातच विधेयक मांडून कायदा जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.