माजी क्रिकेटपटू अन् केजरीवालांचे छायाचित्र व्हायरल
वृत्तसंस्था/ कुरुक्षेत्र
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांचे आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासोबतचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. कपिल देव कुरुक्षेत्रमध्ये 29 मे रोजी होणाऱया आम आदमी पक्षाच्या सभेदरम्यान पक्षप्रवेश करू शकतात असा कयास वर्तविण्यात येत आहे. या सभेत केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील सामील होणार आहेत.
कपिल देव यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्यास हरियाणात केजरीवाल यांच्या पक्षाला मोठा चेहरा मिळणार आहे. हरियाणामध्ये 2024 साली विधानसभा निवडणूक होणार आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर आता आम आदमी पक्ष हरियाणावर लक्ष केंद्रीत करत आहे. स्वतः अरविंद केजरीवाल हे मूळचे हरियाणाच्या सिवानी येथील आहेत.
आम आदमी पक्ष कपिल देव यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पंचकूला मतदारसंघाची उमेदवारी देऊ शकतो. हरियाणामध्ये क्रीडापटूंबद्दल लोकांमध्येच नव्हे तर राजकीय पक्षांमध्येही क्रेझ राहिली आहे. हरियाणाच्या मंत्रिमंडळात दिग्गज हॉकीपटू राहिलेले संदीप सिंह क्रीडामंत्री म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबीता फोगट आणि ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशा स्थितीत आम आदमी पक्ष कपिल देव यांना पक्षात सामील करून क्रीडापटूंना स्वतःशी जोडण्याची मोहीम सुरू करू शकतो.
कपिल देव यांच्यासह ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंद्र सिंह यांनीही अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. तर आम आदमी पक्षाने पंजाबमधून माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह यांना राज्यसभेवर पाठविले आहे.