नवी दिल्ली/वृत्तसंस्था
काँग्रेस पक्षातील जी-23 या नेत्यांच्या समुहातील प्रमुख नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी बुधवारी पक्षाला रामराम केला आहे. 16 मे रोजीच आपण राजीनामा काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपविला असल्याची माहिती कपिल सिब्बल यांनी दिली. आता ते समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून काँग्रेसमधील काही ज्ये÷ नेत्यांनी काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्षाच्या नियुक्तीपासून पक्षांतर्गत बदलांची मागणी करत वेगळी भूमिका घेतली होती. आता कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षातील बदलांचा आग्रह सोडत वेगळा मार्ग चोखाळला आहे. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा मोठा निर्णय घेतला. कपिल सिब्बल काँग्रेसमधून बाहेर पडल्याने जी-23 गटातून एक नेता पक्षाबाहेर पडला आहे.
ते 2004 ते 2014 यादरम्यान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. कपिल सिब्बल हे राजकारणासोबत एक कायदेतज्ञदेखील आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अनेक महत्त्वाचे खटले लढवले आहेत. त्यांना समाजवादी पक्षासह राष्ट्रीय जनता दल आणि झारखंड मुक्ती मोर्चा आदी पक्षांकडून ऑफर असल्याचीही चर्चा सुरू होती. या तिन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांचे खटले सिब्बल यांच्याकडे आहेत. समाजवादी पक्षाचे महत्त्वाचे नेते आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळवून देण्यात सिब्बल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आझम खान यांचा खटला सिब्बल यांनी लढवला होता. त्याशिवाय नॅशनल हेराल्ड खटल्यात राहुल गांधी यांच्यावतीने ते बाजू मांडत आहेत.
समाजवादीकडून राज्यसभेची उमेदवारी
समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना कपिल सिब्बल यांच्यासोबत सपाचे प्रमुख अखिलेश यादवदेखील उपस्थित होते. समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाने डिंपल यादव, जावेद अली खान आणि कपिल सिब्बल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कपिल सिब्बल हे उत्तरप्रदेशमधून काँग्रेसच्या कोटय़ातून खासदार आहेत. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे फक्त दोनच उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे सिब्बल यांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी इतर मार्गांची चाचपणी सुरू केली होती. सपाकडील आमदारांचे संख्याबळ पाहता कपिल सिब्बल राज्यसभेत निवडून जाणे निश्चित मानले जात आहे.
मोदी सरकारविरोधात
आघाडी बनविण्याचे संकेत
‘मी 16 मे रोजीच काँग्रेस पक्ष सोडला. आता आम्ही विरोधी पक्षात राहून मोदी सरकारविरोधात आघाडी तयार करू इच्छितो. 2024 पूर्वी मोदी सरकारच्या सर्व चुका लोकांपर्यंत पोहोचतील असे वातावरण बनविण्यासाठी मी प्रयत्न करेन,’ असे राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कपिल सिब्बल म्हणाले.