बेळगाव प्रतिनिधी : मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील सांडपाणी मिसळल्याने कपिलेश्वर तलावातील पाणी दूषित झाले होते. गणेशोत्सव विसर्जनात अडथळा निर्माण झाल्याने पाणी उपसा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. अखेर पूर्ण तलावातील दूषित पाण्याचा उपसा करण्यात आला असून स्वच्छ पाणी तलावात सोडण्यात आले. त्यामुळे गुरुवारी सकाळी गणेशमूर्ती विसर्जनास तलाव सज्ज झाला होता.
मंगळवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पावसाचे पाणी रस्त्यावरून जुन्या तलावात मिसळले होते. परिसरातील ड्रेनेजवाहिन्या आणि गटारी तुंबल्याने पाणी निचरा होण्याचा मार्ग बंद झाला होता. परिणामी रस्त्यावरील सांडपाणी तलावात शिरले. तलावाच्या कठडय़ाची उंची कमी असल्याने रस्त्यावरील पाणी तलावात मिसळले. गणेशोत्सवामुळे घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात येत आहे. पण दूषित पाण्यात विसर्जन कसे करायचे? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली. सदर पाणी उपसा करण्यासाठी मनपाच्या अधिकार्यांनी मंगळवारी रात्री विद्युतपंप सुरु केले. मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसभर पाणी उपसा करून तलावातील संपूर्ण दूषित पाणी काढण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बुधवारी रात्री नव्याने शुद्ध पाणी तलावात सोडण्यात आले. त्यामुळे विसर्जनासाठी गुरुवारी सकाळपासून कपिलेश्वर तलाव सज्ज झाला आहे. नवव्या दिवशी काहि भाविक घरगुती गणरायांचे विसर्जन करतात. तलावात स्वच्छ पाणी सोडण्यात आल्याने विसर्जनातील अडचण दूर झाली आहे.
मात्र यापुढे जोराचा पाऊस झाल्यास तलावात सांडपाणी शिरण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे तलावाच्या चारहि बाजूच्या कठडय़ांची उंची वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने आतापासूनच कृती आराखडा करावा, पुढील वर्षांच्या आत कठडय़ांचे बांधकाम पूर्ण करून समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.


previous post