Tarun Bharat

कराड, फलटण, वाईचा बिगुल

18 ऑगस्टला मतदान; रहिमतपूर, म्हसवड पालिकेचाही समावेश; आचारसंहिता लागू

प्रतिनिधी/कराड

राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या 17 जिल्हय़ांतील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. यानुसार सातारा जिल्हय़ातील कराड, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, वाई या पाच नगरपालिकांसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात सातारा, महाबळेश्वर व पाचगणी या नगरपालिका तसेच मेढा नगरपंचायतींचा समावेश नसून या पालिकांची निवडणूक दुसऱया टप्प्यात होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवरील स्थगिती उठवून 10 मार्चपासून स्थगित प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार  नगरपालिकांची प्रभाग रचना व आरक्षण सोडत झाल्यानंतर 5 जुलैला प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम झाल्या आहेत. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी 20 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी 22 जुलै ते 28 जुलै असा असून या दरम्यानच्या शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. उमेदवारी अर्जांची छाननी 29 जुलैला होणार असून 4 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लगतच्या दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होणार असून 18 ऑगस्टला मतदान होणार आहे. मतमोजणी व निकाल 19 ऑगस्टला होणार आहे.

कराडला 31 तर फलटणला 27 सदस्य

जिल्हय़ातील निवडणूक लागलेल्या कराड व फलटण या ब वर्ग नगरपालिका आहेत. तर वाई, रहिमतपूर, म्हसवड या क वर्ग नगरपालिका आहेत. कराडमध्ये सदस्यसंख्या 31 असून फलटणला 27 आहेत. वाईमध्ये 23 सदस्य निवडून द्यावयाचे असून म्हसवड, रहिमतपूर पालिकेत 20 नगरसेवक आहेत.

कराड, वाईचा समावेश झाल्याने आश्चर्य

सर्वोच्च न्यायालयाने कमी पावसाच्या भागातील पालिका निवडणुका तातडीने घेण्याचे व जास्त पावसाच्या भागातील निवडणुका दुसऱया टप्प्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सातारा, पाचगणी, महाबळेश्वर या जास्त पावसाच्या निवडणुका दुसऱया टप्प्यात ठेवल्या आहेत. तर मेढा नगरपंचायतही मागे ठेवली आहे. मात्र जास्त पाऊस असणाऱया वाई व अतिवृष्टीसह महापुराचा फटका बसणाऱया कराड पालिकेचा पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत समावेश झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अतिवृष्टी, पूरस्थिती उद्भवल्यास परिस्थितीनुरूप बदल

ऐन पावसाळय़ात पालिका निवडणुकांचा पहिला टप्पा होत असताना हवामान खात्यातील अधिकाऱयांच्या हवाल्याने कमी पाऊस असणारे 17 जिल्हय़ातील 77 तालुके निवडले आहेत, ज्या ठिकाणी पावसामुळे निवडणूक बाधित होण्याची शक्यता कमी आहे. या तालुक्यांतील पालिका निवडणुका जाहीर केल्या आहेत. तरीही निवडणुकीच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी, पूरस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱयांनी तातडीने आयोगाला सादर करावा. आवश्यक असल्यास परिस्थितीनुरूप निवडणूक कार्यक्रमात बदल करावेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

जिल्हाधिकारी कार्यक्रम जाहीर करणार ः 20 जुलै

उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी ः 22 ते 28 जुलै

अर्जाची छाननी ः 29 जुलै

अर्ज मागे घेण्याची मुदत ः 4 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंत

उमेदवारी अर्जावरील अपिल ः 8 ऑगस्ट

मतदानाचा दिनांक ः 18 ऑगस्ट

मतमोजणी आणि निकाल ः 19 ऑगस्ट

Related Stories

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

Tousif Mujawar

किरीट सोमय्या जाणार बुधवारी जरंडेश्वरवर

Patil_p

जंगली मांजरीच्या नखांची तस्करी करणाऱया दोघांना अटक

Patil_p

मेडिकल कॉलेजला जागा हस्तांतरणाचा घेतला आढावा

Patil_p

सांगली जिल्हय़ात चौघांचा बळी, नवे ६१ रूग्ण

Archana Banage

पत्रकारांना केरोना लस देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवणार

Amit Kulkarni