मलप्पूरम (केरळ)
75 व्या राष्ट्रीय पुरुषांच्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेतील ब गटात गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात कर्नाटकाने विद्यमान विजेत्या सेनादलाला 1-0 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का दिला. अन्य एका सामन्यात मणिपूरने गुजरातला 2-0 असा पराभवाचा धक्का दिला.
गुरुवारच्या या सामन्यात एकमेव निर्णायक गोल खेळाच्या पूर्वार्धात कर्नाटकाच्या पी. अंकितने नोंदविला. 2019 साली झालेल्या या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात सेनादलाने कर्नाटकाचा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड कर्नाटकाने 2022 च्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत केली. सेनादलाचा हा दुसरा पराभव आहे. या सामन्याच्या निकालानंतर ब गटाची स्थिती समतोल असून कर्नाटकाने या गटात दोन सामने जिंकले आहेत. त्यांचा पुढील सामना मणिपूर संघाबरोबर होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकेल. सेनादलाचा पुढील सामना येत्या सोमवारी ओडिशाबरोबर होणार असून या संघाला स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.