येणाऱ्य़ा कर्नाटक विधानसभेच्य़ा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत येऊन मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर येईन असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी व्यक्त केला. ते आज उत्तर कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील हुंगुंड येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना बोलत होते. आपल्या मुख्यमंत्री काळात त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले असून त्यामुळे वार्षिक दरडोई उत्पन्न 1 लाख रुपयांनी वाढल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येईन. देवाने मला कर्नाटक मातेची सेवा करण्याची संधी दिली आहे. मी प्रामाणिकपणे काम केले आहे. 12 व्या शतकात समाजसुधारक आणि लिंगायत पंथाचे संस्थापक बसवेश्वर यांनी सांगितलेल्या ‘काम हीच पूजा’ आणि ‘सामाजिक समता’ या मार्गावरच आपण जात आहे” असे सांगताना “मी समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांनी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध समुदायांच्या सहकार्याची मागणी केली आहे. आम्ही बसवेश्वरांनी दाखवलेल्या मार्गावरच चालत आहोत,” असे मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजप नेते बाबूराव चिंचनसूर कर्नाटकमध्ये काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचे चर्चा जोर धरत आहे. कल्याण कर्नाटक भागातील कोळी- कबालिगा समाजाचे नेते मानले जाणारे चिंचनसूर यांनी आपल्या विधान परिषदेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.