भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या निमित्ताने भेट, सीमाभागात उत्सुकता
@ गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये एका दिमाखदार कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे नेते भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली आहे. या शपथविधी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमवारी त्यांची एकमेकांशी भेट झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये काहीकाळ चर्चाही झाली. ती नेमकी कोणत्या मुद्दय़ांवर झाली हे समजले नसले तरी त्यामुळे सीमाभागात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची दुसऱयांदा नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, गुजरात भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचा सहभाग असलेल्या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री इत्यादी मान्यवर नेते उपस्थित होते. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पटेल यांना पद आणि गोपनियतेची शपथ देवविली. हा कार्यक्रम राजभवनाजवळील हेलिपॅड मैदानात झाला.
16 मंत्र्यांचाही शपथविधी
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या समवेत 16 मंत्र्यांनाही पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. या मंत्र्यांमध्ये 8 कॅबिनेट मंत्री, सहा राज्यमंत्री आणि दोन स्वतंत्र पदभार असणारे मंत्री यांचा समावेश आहे. सलग दुसऱयांदा मुख्यमंत्री बनणारे पटेल हे पाटीदार समाजाचे प्रथमच नेते ठरले आहेत. मंत्र्यांच्या शपथविधीनंतर सायंकाळी झालेल्या संयुक्त बैठकीत खातेवाटपही करण्यात आले.
मंत्रिमंडळात सामाजिक समतोल
पटेल यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यासह 17 मंत्री आहेत. त्यांच्यापैकी सातजण अन्य मागासवर्गीय समाजातील असून पाटीदारांची संख्या चार आहे. तर दोन मंत्री वनवासी समाजातील आहेत. अनुसूचित जाती, ब्राह्मण, जैन आणि रजपूत समाजातील प्रत्येकी एका नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये एका महिला मंत्र्यांनाही संधी मिळाली आहे.
पंतप्रधान मोदी नतमस्तक
शपथविधी कार्यक्रमाला जनसागर लोटला होता. पंतप्रधान मोदी या जनसागरासमोर नतमस्तक झाले. त्यांनी लोकांना वाकून विनम्र अभिवादन केले. त्यावेळी उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला. हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.
नूतन मंत्र्यांची नावे
कॅबिनेट मंत्री ः ऋषिकेश पटेल, राघवजी पटेल, बलवंतसिंह चंदनसिंह रजपूत, कुंवरजीभाई मोहनभाई बावलिया, कनुभाई देशाई, कुबेरभाई दिनदोर, भानूबेन बावरिया, मुलूभाई बेरा
राज्यमंत्री ः पुरुषोत्तम सोळंकी, बच्चूभाई खाबड, मुकेश पटेल, कुंवरजी हलपती, भिकूसिंह परमार, प्रफुल्ल पानसेरिया
स्वतंत्र प्रभार मंत्री ः हर्ष संघवी, जगदीश विश्वकर्मा
मुख्यमंत्र्यांच्या भेटीची सर्वत्र चर्चा
या शपथविधी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विमानतळावर काही काळ चर्चा झाली. ही चर्चा हे या शपथविधी कार्यक्रमाचे सीमाभागाच्या दृष्टीने आकर्षण ठरले. त्यांच्या चर्चेत बेळगावचा प्रश्न होता का, याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या चर्चेच्या वेळी उपस्थित होते. 14 डिसेंबरला (येत्या बुधवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेत दोन्ही राज्यांची दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती चर्चेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. आपण त्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. याच विजयाची पुनरावृत्ती कर्नाटकातही होईल, असा विश्वास बोम्माई यांनी व्यक्त केला. कर्नाटकात येत्या मे महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.