खानापूर तालुक्याला अतिथी शिक्षक देण्यातही मोठा अन्याय, केवळ 66 जणांची नेमणूक
प्रतिनिधी /खानापूर
किमान 150 मराठी अतिथी शिक्षक देण्याची गरज होती. पण केवळ 66 मराठी अतिथी शिक्षक देण्यात आले आहेत. कर्नाटक शासनाने मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड शिक्षकांची गरज नसतानाही त्या माध्यमासाठी 106 अतिथी शिक्षक नियुक्त केले जाणार आहेत. तर उर्दू माध्यमासाठी 16 शिक्षक नियुक्त होणार आहेत. यामध्ये खानापूरच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने दिशाभूल करून मराठी शिक्षकांच्या 180 जागा रिकाम्या असताना केवळ 66 जागांची गरज असल्याचे दाखविले आहे.
वास्तविक मराठी शिक्षक नसल्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात बऱयाच शाळा शिक्षकाविना सुरू होत्या. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. यावर्षी तरी आवश्यक तितक्या मराठी शिक्षकांच्या जागा अतिथी शिक्षकांच्या माध्यमातून भरल्या जातील, अशी अपेक्षा होती. पण कर्नाटक शासनाने मराठी शाळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कमी जागा दाखवल्याने पुन्हा मराठी माध्यमाच्या शिक्षणाची हेळसांड होणार आहे. तालुक्यातील मराठी शाळा हळूहळू बंद पाडाव्यात, हाच राज्य शासनाचा कुटिल डाव आहे.
वास्तविक खासदार अनंतकुमार हेगडे व आमदार अंजली निंबाळकर यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मराठी शाळांवर होणारा अन्याय दूर करणे गरजेचे आहे. आता हे दोन्ही नेते खानापूर तालुक्यातील मराठी शाळांवरील अन्यायासंदर्भात नेमकी कोणती भूमिका घेणार याकडेच समस्त मराठी जनतेचे व पालकवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. आता म. ए. समितीने देखील याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज असल्याची भावना मराठी भाषिकांतून व्यक्त केली जात आहे.
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आज निवेदन देणार
अतिथी शिक्षक देण्यात मराठी शाळांवर झालेला अन्याय सहन होणारा नाही. वास्तविक मराठी शिक्षकांची गरज असताना कानडी शिक्षक घेण्यावर भर देण्यात आला आहे. हा मराठी माध्यमावर मोठा अन्याय असून याविरुद्ध मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने बुधवारी सकाळी 11 वाजता क्षेत्रशिक्षणाधिकाऱयांना निवेदन देवून त्यांना या अन्यायासंदर्भात जाब विचारला जाणार आहे. जर मराठी शाळांना आवश्यक असलेल्या अतिथी शिक्षकांच्या जागा न भरल्यास मराठी सांस्प़ृतिक प्रतिष्ठानच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी दिला आहे.
हा तर मराठी शाळा बंद पाडण्याचा डाव
वास्तविक खानापूर तालुक्यात मराठी शिक्षकांची मोठी कमतरता आहे. याची माहिती असतानादेखील अतिथी शिक्षक देताना मराठी शाळांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे. याचे उदाहरण म्हणजे गेल्यावर्षी नंदगडमधील जॉईंट सेंट्रल स्कूलला दोन मराठी व एक कन्नड असे एकूण तीन अतिथी शिक्षक देण्यात आले होते. पण यावर्षी एकही मराठी अतिथी शिक्षक न देता केवळ एकच कन्नड अतिथी शिक्षक देण्यात आला आहे. हा जॉईंट सेंट्रल स्कूलवरील मोठा अन्याय झाला आहे. याविरुद्ध येत्या सोमवार दि. 23 रोजी शाळेच्या विद्यार्थ्यांसह खानापूरच्या क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, असा इशारा जि. पं. माजी सदस्य पुंडलिक कारलगेकर यांनी दिला आहे.