चित्रदुर्ग : कर्नाटकातील चित्रदुर्गा जिल्ह्यातील जगदगुरू मुरुगराजेंद्र विद्यापीठ मठाचे धर्मगुरू शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांच्याविरुद्ध गुरूवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या संदर्भातील माहीती चित्रदुर्ग पोलीसांनी माध्यमांना दिली आहे.
या प्रकरणी बाल कल्याण समितीने म्हैसूरमधील नजरबाद पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 आणि 14 वर्षे वयोगटातील दोन अल्पवयीन मुली मठाद्वारे चालवल्या जाणाऱ्या श्री जगदगुरू मुरुघा (एसजेएम) शैक्षणिक संस्थेत शिकत होत्या. मठात काम करणाऱ्या दोन मुलींच्या पालकांनी ही तक्रार दाखल केली होती.
धर्मगुरू शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांच्याविरुद्ध आश्रमाकडून चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार धर्मगुरू शरनारू विरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पीओसीएसओ) कायद्यांतर्गत दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. तत्पुर्वी, २५ ऑगस्ट रोजी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.