पंचायत निवडणुकीच्या दृष्टीने सुरक्षा पैलूवर चर्चा, सलोख्याचे संबंध ठेवण्यासह अनेक निर्णय
प्रतिनिधी /काणकोण
आगामी पंचायत निवडणुकीच्या वेळी सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने लक्ष देण्याबरोबर विविध बाबींवर चर्चेसाठी दक्षिण गोव्यातील सीमेवरील काणकोण आणि कर्नाटकच्या कारवार पोलिसांची संयुक्त बैठक नुकतीच काणकोणच्या पोलीस स्थानकावर घेण्यात आली आणि दोन्ही पोलिसांमध्ये करार करण्यात आला. अशा प्रकारे पहिल्यांदाच दोन्ही राज्यांतील पोलिसांची संयुक्त बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीत विविध प्रकारच्या गुन्हय़ांवर चर्चा करतानाच येणारी पंचायत निवडणूक सुरळीतपणे पार पडण्यासाठी सीमेवरील पोलिसांकडून सहकार्याची कशी अपेक्षा आहे ते स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर गुन्हय़ांशी संबंधित व्यक्तींची एक यादी तयार करणे, पोलीस स्थानकावर नोंद झालेल्या बेपत्ता व्यक्तींची यादी तयार करणे, निवडणुकीच्या वेळी कसलीही विपरित घटना घडल्यास दोन्ही पोलीस स्थानकांनी संयुक्तपणे ते प्रकरण सोडविणे त्याचबरोबर दोन्ही पोलीस स्थानकांमध्ये सलोख्याचे संबंध ठेवणे असे महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले. या बेठकीला पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस, वाहतूक पोलीस निरीक्षक महेश वेळीप, सीआयडीचे उपनिरीक्षक सूर्यकांत सावळ आणि काणकोण पोलीस स्थानकावरील अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर या संयुक्त बैठकीला कारवारचे पोलीस उपअधीक्षक वॅलेन्टोन डिसोझा, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक गोविंदराज देसाई, चित्ताकुला पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विश्वनाथ आणि गुन्हा अन्वेषण विभागाचे अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी केले.