ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक व्हावी, अशी लोकांची इच्छा आहे. त्यामुळे बिनविरोधसाठी कितीही प्रयत्न झाले तरी या दोन्ही निवडणुका होणार आहेत. कसब्याची जागा काँग्रेस लढवणार आहे. तर चिंचवडच्या जागेसाठी मविआ एकत्रित निर्णय घेईल. दरम्यान, या दोन्ही जागा मविआच जिंकणार असल्याचा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.
आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, कसबा आणि चिंचवडच्या जागेसाठी आम्ही सर्व्हे केला. सध्याच्या सरकारला राज्यातील वातावरण अनुकूल नसल्याचे दिसून आले. या निवडणुका व्हाव्यात, ही लोकांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही या जागा लढवत आहोत. कसब्याची जागा आम्ही काँग्रेसला सोडली. आता चिंचवडच्या जागेवर महाविकास आघाडी एकत्रित निर्णय घेईल. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट इच्छूक आहे.
अधिक वाचा : पुणे जिल्ह्यातील नऊ गुन्हेगार एकाच वेळी तडीपार
दरम्यान, या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही. तसा संपर्क होण्याची शक्यता देखील नाही.