ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा विधानसभेची तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. आता यासंदर्भात प्रत्यक्ष चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.
फडणवीस एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप उमेदवाराच्या नावाची घोषणा दिल्लीतून होईल. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे. आता मी प्रत्यक्ष जाऊन चर्चा करणार आहे. त्यामुळे बिनविरोध करण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे.
अधिक वाचा : भाजपमध्ये यायचे की नाही, ते सत्यजीत तांबे ठरवतील
फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट
कसबा पोटनिवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले शैलेश टिळक यांची शुक्रवारी रात्री टिळक यांच्या निवासस्थानी फडणवीसांनी भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दरवाजा आड काही मिनिटे चर्चा झाली. फडणवीस यांच्या भेटीनंतर टिळक यांची समजूत घातली की, स्थान पक्के केले, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिरंजीव कुणाल इच्छुक आहेत. शहर भाजपकडूनही या दोघांची नावे प्रदेशला कळविण्यात आली आहेत.