आठवड्यातील दुसरी घटना ; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
कासेगाव/वार्ताहर
वाळवा तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून येवलेवाडी येथील तांबवे रस्त्यालगत दंडभाग व गावालगत असणाऱ्या घराशेजारच्या गोठ्यातील जनावरांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पंजाब नाना जगताप रा. येवलेवाडी यांच्या म्हशीचे रेडकू ठार झाले असून गेल्या चार दिवसापूर्वी शेजारीच असणाऱ्या अधिक ईश्वरा जगताप यांच्या पाळीव कुत्र्यावर देखील हल्ला करून ठार केले आहे. घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. तसेच याच दिवशी तालुक्यातील मरळनाथपूर येथे मांजराच्या पाठीमागे लागून बिबट्या घरात शिरला होता.
कासेगाव, नेर्ले, काळमवाडी, भाटवाडी, केदारवाडी, वाटेगाव, शेणे, तांबवे, येवलेवाडी, धोत्रेवाडी गावच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून स्थानिकांना बिबट्या व त्याच्या बछड्याचे वारंवार दर्शन होत आहे. दोन बिबटे व दोन बछडे असल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात येत आहे. पंजाब नाना जगताप यांचे घराशेजारीच जनावरांचा गोठा असून आजूबाजूला ऊसाची शेती आहे. गोठ्याला अंदाजे चार-पाच फुट उंच भिंती व त्याच्यावर नेट लावून बंदिस्त केले आहे. यामध्ये लहान मोठी पाच जनावरे असून नेटच्या कडेने भिंतीवरून बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून म्हशीच्या रेडकूवर हल्ला केला आहे व त्याला गोठ्या बाहेर नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा प्रयत्न फसल्याने अर्धवट खावून रेडकूला तेथेच सोडून दिले होते. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनपाल सुरेश चरपाले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंजाब जगताप, पोलीस पाटील अरविंद जगताप व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला व जनावरांवरील हल्ला बिबट्याचाच असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिसरात बिबट्याला वावरण्यासाठी ऊसाची शेती असून बिबट्याला जंगल व शेती यामधील फरक कळत नाही त्यामुळे बिबट्यापासून संरक्षणासाठी आवश्यक माहिती व सूचना त्यांनी येथील लोकांना दिलेल्या असून गावातील सर्वांना सविस्तर माहिती देण्यासाठी येत्या चार दिवसात प्रोजेक्टवर माहिती प्रसारित करण्याचा उपक्रम करणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र बिबट्याच्या हल्याने व त्याच्या वारंवार होत असलेल्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला पकडून त्याला वनक्षेत्रात सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.