वाराणसीतील काशी विश्वनाथाच्या गर्भगृहाला आतून सोन्याने मढविण्यात आले आहे. गेले तीन महिने ही प्रक्रिया सुरू होती. गेल्या बुधवारी हे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. या गर्भगृहाच्या आतील भिंती गेल्या महाशिवरात्रीलाच स्वर्णमंडित करण्यात आल्या होत्या. आता बाहेरच्या भिंतीवरही सोन्याचे पत्रे बसविण्यात आले आहेत. यासाठी एकंदर 60 किलो सोने उपयोगात आणण्यात आले आहे.
विशेष म्हणजे गर्भगृह सुवर्णमय करण्यासाठीचे सोने दक्षिण भारतातील एका उद्योगपतीने दान दिले आहे. गेल्या जानेवारीत हे कार्य सुरू झाले. तीन महिन्यांपूर्वी त्याला वेग आला. प्रथम तांब्याचे साचे बनवून त्याला सुवर्णाचा मुलामा देण्यात आला. हा मुलामा एक मिलिमीटर जाडीचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी आले होते. त्यापूर्वी आतील भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले होते. यासाठी बारा सुवर्णकारांची नियुक्ती करण्यात आली होती. मुख्य काम पंधरा दिवसात पूर्ण करण्यात आले. सुवर्णाला धोका पोहोचू नये म्हणून त्यावर पारदर्शी ऍक्रॅलिक पडदा बसविण्यात आलेला आहे. गर्भगृहाच्या आतील भागाला सोन्याने मढविण्यासाठी 37 किलो सोने लागले आहे. तर बाहेरच्या भागासाठी 23 किलो सोन्याचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे सध्या चर्चेत असणारे हे मंदिर आता झगमगू लागले आहे.