श्रीनगर
काश्मीरमधील शोपियान जिह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला. स्थानिक रहिवाशांनी या घटनेचा निषेध केल्यानंतर अधिकाऱ्यांनी या घटनेच्या दंडाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. पुलवामा आणि शोपियान दरम्यानच्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त तळावर गोळीबार केला. यादरम्यान झालेल्या संघर्षात एक नागरिक गंभीर जखमी झाला. शोपियानमधील तुर्कवांगम येथील रहिवासी शोएब अहमद गनई या जखमी नागरिकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.
शोपियानच्या तुर्कवांगम भागातील घटनेची दंडाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. दंडाधिकाऱ्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. चकमकीनंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. सुरक्षा जवानांकडून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून शोधमोहीम सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.