Tarun Bharat

काश्मिरी नीलमणी

Advertisements

काश्मिरी नीलमचा होणार जागतिक बाजारात लिलाव

किश्तवारमधील पद्दार रेंजमध्ये 5 हजार कोटींचा साठा

लिलावात सरकारला चांगली किंमत मिळण्याची अपेक्षा

जम्मू-काश्मीर सरकार पहिल्यांदाच किश्तवार पद्दारच्या खाणीतून काढलेल्या अनमोल नीलमणीचा ऑनलाईन लिलाव करणार आहे. किश्तवार पर्वतरांगांमधील 116 किमीच्या परिघात 2,700 कोटी रुपयांचे नीलम साठे असल्याचा दावा केला जात आहे. त्याशिवाय काही तज्ञांच्या मते हा आकडा 5,000 कोटींहून अधिक असू शकतो, असा अंदाजही वर्तवला जात आहे. सध्या स्टॉकमध्ये असलेल्या नीलमचे मूल्यांकन केले जात आहे. एवढेच नाही तर संपूर्ण प्रदेशात नीलमचे नवीन साठे शोधण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासन सर्वेक्षण करत आहे. त्यानंतरच जागतिक ई-लिलाव प्रक्रिया सुरू होताच अनेक देशांतील खरेदीदार आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे. अर्थातच सरकारच्या या पवित्र्यामुळे सर्वदूर प्रसिद्ध असलेला काश्मिरी निलमणी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकच चमकणार आहे.

जम्मू-काश्मीर प्रशासन पहिल्यांदाच जागतिक बाजारपेठेत काश्मिरी नीलमचा लिलाव करणार आहे. हा बहुमूल्य नीलम किश्तवाडच्या पद्दार टेकडय़ांमध्ये आढळतो. गेल्या काही वर्षांत पद्दार रेंजमधून काढले गेलेले नीलम लिलावात ठेवण्यात येणार आहे. या लिलावातून सरकारला चांगली किंमत मिळण्याची अपेक्षा आहे. मेटल अँड मिनरल्स टेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एमएमटीसी) या सर्व लिलाव प्रक्रियेचे आयोजन केले जाईल. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) ने किश्तवाड जिह्यातील नीलमांच्या साठय़ांचा शोध घेण्यासाठी गेल्यावषी सर्वेक्षण केले होते. या पाहणीत 116 किमीच्या परिघात 2,700 कोटी रुपयांचे नीलम साठे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

बर्फाच्या गर्भात निलमणी

काश्मीर खोरे आणि लडाख यांच्यामध्ये पद्दार टेकडय़ा आहेत. यामध्ये 14 हजार फूट उंचीवर नीलमच्या खाणी आहेत. नऊ महिने बर्फाने आच्छादलेले हे ठिकाण किश्तवाडपासून 115 किमी अंतरावर आहे. येथे पोहोचायला तीन दिवस लागतात.  नीलम खाणीपर्यंत पोहोचण्यापूर्वी केवळ नऊ घरांचे सुंचाम गाव हे शेवटचे लोकवस्तीचे गाव आहे. वीज, मोबाईल रेंज नसलेल्या या गावात बर्फाळ ग्लासातूनच पाणी प्यावे लागते. संपूर्ण परिसर सुनसान असतो. जास्त उंचीमुळे झाडे तर दूर, झुडपेही नाहीत. इतक्मया दुर्गम ठिकाणी नीलमचा साठा आढळतो. असे असतानाही येथे मोठय़ा प्रमाणात अवैध उत्खनन केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. खराब हवामानात, नशिबावर अवलंबून राहून तस्कर निसर्गाच्या पोटातील खजिना शोधतात.

तापमान शून्याखाली

सुंचाममपासून पाच किलोमीटर वरच्या टेकडय़ांवर खाणकाम केले जाते. आजूबाजूला बर्फाचे डोंगर असल्यामुळे आणि अतिउंचीमुळे इथे खूप थंडी असते. येथील तापमान दिवसा 5 ते 10 अंशांवर असते, तर रात्रीचे तापमान उणे 2 अंशांपर्यंत खाली जाते. येथे काम करणारे कामगार विशेष उबदार कपडे वापरतात. जुलै ते सप्टेंबरपर्यंत बर्फ थोडासा वितळल्यानंतर खाणकाम चालते.

1885 मध्ये लागला शोध

इंडियन रिमोट सेन्सिंग सेंटर हैदराबादने केलेल्या सर्वेक्षणानुसार नीलम पर्वत अवघ्या 6.65 चौरस किलोमीटरमध्ये व्यापलेले आहे. 1885 मध्ये येथून पहिल्यांदा नीलम काढण्यात आला होता. मध्यंतरीही खाणकाम सुरूच राहिले पण दहशतवादी कारवाया सुरू झाल्यापासून कामगारांनी येथे जाणे बंद केले. 2004 मध्ये वातावरण शांत झाल्यावर येथे पुन्हा काम सुरू झाले.

पोलीस बंदोबस्तात उत्खनन

‘जेकेएमएल’कडे 6 चौरस किमीच्या छोटय़ा क्षेत्रात खाण लीज आहे. हा भाग नऊ महिने बर्फाने झाकलेला असतो. जूनच्या आसपास येथील खाणकाम सुरू होते आणि पोलिसांच्या देखरेखीखाली खाण पथक कच्चे नीलम काढते. वाटेत हिमनद्याही असल्यामुळे किश्तवाडहून पद्दार हिल्सपर्यंत पोहोचण्यासाठी टीमला तीन दिवस लागतात.

काळाबाजाराचा संशय

नीलमचे बेकायदेशीर उत्खनन होत असल्याच्याही बातम्या आल्या आहेत. 2014 मध्ये, एका अमेरिकन टीव्ही शोमध्ये या भागात अवैध खाणकाम होत असल्याचा पर्दाफाश केला होता. तसेच काश्मिरी नीलम काळय़ा बाजारातून एक कोटी रुपयांना कसा विकत घेतला हेही दाखवले होते. वर्षानुवर्षे, पोलिसांनी काश्मिरी नीलमच्या बेकायदेशीर व्यापारात सहभागी असलेल्या लोकांनाही अटक केली होती. परंतु विस्तीर्ण दुर्गम भूभागामुळे संपूर्ण क्षेत्रावर बारीक लक्ष ठेवणे कठीण असते.

बनावटगिरी…

सुप्रसिद्ध हिरा कोहिनूरची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. त्याचप्रमाणे काश्मिरी नीलम ओळखण्याचाही एक अनोखा अंदाज आहे. अनेकदा निकृष्ट दर्जाचे हिरे पॉलिश करून चांगले भासवण्याचा प्रयत्न केला जातो. पॉलिश्ड नीलम रत्नाचे मूळ पारखण्याचे कसबही काहींना अवगत आहे. काश्मीरचे नीलम खूप चांगले मानले जायचे पण आता गेल्या अनेक दशकांपासून बनावटगिरीही दिसून येते.

काश्मिरी नीलम जगभरात सर्वोत्तम

किश्तवाडमध्ये 1880 नंतर पद्दार परिसरात डोंगर उतारावर नीलम सापडल्याचा दावा केला जातो. काश्मिरी नीलमणीचा रंग गडद निळा म्हणजेच मोराच्या मानेसारखा निळा असतो. तो अतिशय पारदर्शक आणि मखमली असतो. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचा नीलम हलका निळा आहे. या नीलमचा रंग प्रकाशात चमकतो. तर इतर नीलम फक्त विशिष्ट प्रकाशातच चमकतात. 2020 मध्ये जिनिव्हास्थित क्रिस्टीज ऑक्शन हाऊसने 35 कॅरेटचा काश्मिरी नीलम 57 कोटी रुपयांना विकला होता. तसेचया लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात काश्मीरमधील आणखी एक नीलम 20 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला. काश्मीरमधील नीलमची ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत ठरली होती.

नीलम रत्नाची किंमत गुणवत्तेवर आधारित

@ गुणवत्ता ः रत्नाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची गुणवत्ता. नीलमच्या उत्पत्तीचे ठिकाण नीलमणीचे मूल्य अनेक पटींनी वाढवू किंवा कमी करू शकते. काश्मिरी नीलमच्या नावावर असलेल्या नीलमची किंमत 50 रुपयांपासून सुरू होते. 50,000 रॅटिस आणि अनेक पट जास्त असू शकतात. यामागेही अनेक गैरसमज आहेत. प्रत्येक काश्मिरी नीलम खूप चांगला असेलच असे नाही. नीलमच्या चांगल्या निळय़ा रंगामुळे नीलमणीची किंमत वाढते. दुसरीकडे, जांभळा, बेज, काळेपणाचा प्रभाव असणाऱया नीलमणीची किंमत कमी असते. छान निळय़ा रंगाच्या नीलमची किंमत सुमारे रु. 4,000 ने सुरू होते.

@ पारदर्शकता ः पारदर्शकता हा नीलमचा एक विशेष गुण आहे. रत्नामध्ये पारदर्शकता नसेल तर तो दगड ठरतो. काही निवडक दगडच रत्न बनू शकतात हा निसर्गाचा चमत्कार आहे. या रत्नांमध्ये निसर्गाची शक्ती असते आणि ते ऊर्जा हस्तांतरित करण्यास सक्षम असतात. पारदर्शकता नीलमणीची शुद्धता दर्शवते. इतर धातू आणि खनिजांच्या शुद्धतेमुळे नीलममध्ये पारदर्शकता कमीही असते.  अपारदर्शक नीलमणीची किंमत खूपच कमी असते.

@ चमक ः रत्नाच्या तेजामुळे नीलमची गुणवत्ता अनेक पटींनी वाढते. कधीकधी नीलमला चांगला रंग आणि पारदर्शकता असूनही मंदपणा असतो. चमक केवळ चांगल्या प्रतीच्या नीलमांमध्ये आढळते. नीलमणीमध्ये चमक असल्यास त्याच्या प्रवाहीपणामुळे रत्नदेखील आकर्षक दिसते आणि ज्योतिषशास्त्रीय प्रभावासाठीदेखील वापरले जाते.

@ समरुपता ः नीलमला चांगला रंग, चांगली पारदर्शकता, चांगली चमक असूनही जर त्याची समरुपता चांगली नसेल तर किंमतीवर परिणाम होतो. चांगली समरुपता देण्यासाठी रत्ने जटिल पद्धतींनी कोरली जातात. कोरीव काम करताना रत्नाचे वजन कमी होत जाते. उर्जेच्या योग्य प्रवाहासाठी चांगली समरुपता आवश्यक आहे. समरुपतेच्या अभावामुळे रत्नाची किंमत घसरते.

जयनारायण गवस

Related Stories

राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

datta jadhav

आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना कोविड लसीसाठी मिळणार प्राधान्य : डॉ. भारती

Rohan_P

‘राजा परांजपे करंडक दीर्घांक स्पर्धे’ची अंतिम फेरी १५ जानेवारीपासून

prashant_c

रंगणार ‘गजर विठू माऊलीचा’..!

datta jadhav

सांस्कृतिक विश्व पूर्ववत व्हावं : महापौर मुरलीधर मोहोळ

Rohan_P

जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले काशीमधील शिवानंद बाबा यांनी घेतली कोरोनाची पाहिली लस

Rohan_P
error: Content is protected !!