वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौर तसेच अष्टपैलू दीप्ती शर्मा यांनी वरच्या स्थानावर झेप घेतली आहे. या ताज्या मानांकन यादीत कौर 11 व्या स्थानावर असून अष्टपैलू दीप्ती शर्मा 25 व्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेत सध्या सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 मालिकेत कर्णधार कौरने विंडीजविऊद्धच्या सामन्यात 35 चेंडूत नाबाद 56 धावा झळकवल्याने तिचे मानांकनातील स्थान तीन अंकांनी वधारले. आता ती 11 व्या स्थानावर असून लवकरच पहिल्या दहा खेळाडूमध्ये प्रवेश करण्यासाठी ती आतुरलेली आहे. अष्टपैलू दीप्ती शर्माने या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात दर्जेदार कामगिरी केली होती. तिने दक्षिण आफ्रिकेविऊद्ध 33 धावा जमवल्या होत्या. या कामगिरीमुळे ती आता अष्टपैलूंच्या यादीत 25 व्या स्थानावर आहे. भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने या ताज्या मानांकन यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. विंडीजविऊद्धच्या सामन्यात तिने नाबाद 74 धावा जमवत सामनावीराचा बहुमानही घेतला होता. मानधनाने 736 गुणासह तिसरे स्थान मिळवले आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये मंधाना या यादीत दुसऱ्या स्थानावर होती. ऑस्ट्रेलियाची ताहिला मॅकग्रा पहिल्या स्थानावर असून बेथ मुनी दुसऱ्या स्थानावर असून मंधाना आणि मुनी यांच्यात आता 24 गुणांचा फरक आहे.
महिला टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची स्नेह राणा हिने पहिल्या दहा गोलंदाजामध्ये स्थान मिळवले आहे. महिलांच्या वनडे ताज्या मानांकनात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी आणि मेग लेनिंग यांनी अनुक्रमे दुसरे आणि पाचवे स्थान मिळवले आहे.