Tarun Bharat

Sangli : कवठेमहांकाळ नगराध्यक्षपदी खा. संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी

कवठेमहांकाळ प्रतिनिधी

कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील गटाचा झेंडा फडकला. या गटाच्या सिंधुताई गावडे या चिठ्ठीने नगराध्यक्ष झाल्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला असून पक्षाने दिलेले उमेदवार राहूल जगताप पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक फुटल्याने हा चमत्कार घडला. निवडणुकीसाठी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवार पासून चालू होती. या पदासाठी चार अर्ज दाखल झाले होते. गुरूवारी दोन अर्ज माघार घेतले आणि राष्ट्रवादीचे राहूल जगताप विरूद्ध खासदार पाटील गटाच्या सिंधुताई गावडे यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले. शुक्रवारी नगराध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. गावडे आणि जगताप यांना आठ आठ अशी समान मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका जयश्री लाटवडे गैरहजर राहिल्याने समान मते पडली. यामुळे लहान मुलाच्या हस्ते गावडे आणि जगताप यांच्य नावापैकी सिंधुताई नावाची चिठ्ठी उचलल्याने गावडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. गावडे यांच्या निवडीची घोषणा समीर सिंगटे यांनी केल्यानंतर खा. पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

कवठेमहांकाळच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मोठी चुरस पाहायला मिळाली. या चुरशीमध्ये खा. संजयकाका पाटील यांनी बाजी मारली. दहा महिन्यापूर्वी कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीची महाराष्ट्रभर चर्चा झाली. खासदार संजयकाका पाटील, माजीमंत्री अजितराव घोरपडे, महांकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या पँनेल विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार सुमनताई पाटील, जि. म. बँकेचे संचालक सुरेश पाटील, युवा नेते रोहीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अशी लढत होऊन राष्ट्रवादीला दहा जागा आणि दिग्गज नेत्यांच्या पॅनेलला सात जागा मिळाल्या. शहराने स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला.

निवडणूक झाल्यानंतर कवठेमहांकाळचे नगराध्यक्षपद खुल्या गटाकडे आले. अश्विनी महेश पाटील या नगराध्यक्ष बनल्या. त्यांनी सात महिन्यानंतर पदाचा राजीनामा दिला आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लागली. या निवडणूकीने राष्ट्रवादीचा खेळ बिघडवला चार सदस्य फुटले ते थेट संजयकाका पाटील यांना जाऊन मिळाले मात्र माजीमंत्री अजितराव घोरपडे यांना पाठींबा देण्यास नकार देवून यांच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहूल जगताप यांना पाठींबा दिला त्यामुळे जगताप व गावडे यांना समान मते मिळाली व चिठ्ठीद्वारे सिंधुताई गावडे या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.

खासदार संजयकाका पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील यांनी नुतन नगराध्यक्षा गावडे यांचा सत्कार केला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष सिंधुताई गावडे यांना गणपती सगरे, नलिनी भोसले, अनिता खाडे, रणजीत घाडगे, ज्ञानेश्वर बेंडे, अजित माने, शेकडे यांनी पाठींबा दिला तर राष्ट्रवादीचे उमेदवार राहूल जगताप यांना मीरा वनखडे, अश्विनी पाटील, संजय माने, संजय वाघमारे, घोरपडे गटाच्या शितल पाटील व शुभांगी शिंदे यांनी पाठींबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री लाटवडे यांनी गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे खा. संजयकाका पाटील यांना पाठींबा दिला असल्याचे समजते.

Related Stories

कोरोनाला दुर्लक्षित करू नका, काळजी घ्या – जयंत पाटील

Archana Banage

नागराळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पहिल्याच दिवशी विकास कामाच्या निधीची भेट

Archana Banage

सांगली जिल्ह्यात 255 जण कोरोनामुक्त तर नवे 185 रूग्ण

Archana Banage

स्थायी, महासभेपाठोपाठ आता लोकशाही दिनही ऑनलाईन

Archana Banage

कुपवाडमध्ये घरफोडी; ४० हजाराचे दागिने लंपास

Archana Banage

सांगली : भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन ही लोकशाहीची गळचेपी – जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख

Archana Banage