बँकांनी अॅपवर माहिती डाऊनलोड करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : प्रत्येकाने माहिती देणे बंधनकारक
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकांच्या रकमेची वाहतूक करण्यासाठी कीम अॅप (खास् Aज्ज्) सुरू करण्यात आले आहे. बँकांनी त्वरित हे अॅप डाऊनलोड करून त्यावर रकमेबाबतची संपूर्ण माहिती व तपशील द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कीम अॅपबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा पंचायत सभागृहामध्ये विविध बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ही सूचना करण्यात आली. सध्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे चेकपोस्टच्या माध्यमातून सर्वत्र तपासणी केली जात आहे. बँकांची रक्कमही ने-आण करण्यात येत असून त्याबाबत कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी हे अॅप रुजू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बँकांनी पैशांच्या देवाण-घेवाणीबाबत माहिती या अॅपवर पाठविणे बंधनकारक आहे. व्यवहाराची माहिती, रकमेचा आकडा, कोणत्या बँकेतून कोणत्या शाखेमध्ये रक्कम पाठविली जात आहे, रक्कम वाहतूक करणाऱ्या वाहनांचा क्रमांक, वाहनांची सर्व कागदपत्रे आणि रक्कम नेत असलेल्या व्यक्तीची संपूर्ण माहिती त्या अॅपवर द्यावी, त्यामुळे कोणताच गेंधळ होणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेच्या अधिकारी व प्रतिनिधींना सांगितले.
जी व्यक्ती रक्कम घेऊन जात असते, त्याच्याकडे आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे अॅप तयार करण्यात आले आहे. त्यावर प्रत्येकाने माहिती देणे बंधनकारक आहे. जर कोणीही बेकायदेशीररित्या रक्कम नेत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बँकेची रक्कम वाहनातून नेत असताना त्यांना सशस्त्र वाहतूक करण्यास मुभा देण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकासह वाहने संबंधित बँकांना घेऊन जाता येणार आहेत. मात्र रकमेचा तपशील असणे गरजेचे आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणी असल्यास त्याबाबत चर्चा करून तात्काळ सोडविल्या जातील. मात्र रकमेचा संपूर्ण तपशील देणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे स्वीप कमिटीचे अध्यक्ष व जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी सांगितले. य् ाा बैठकीला जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील उपस्थित होते. त्यांनीही सर्व बँकांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी या अॅपबाबत गांभीर्याने घेऊन व्यवहाराबाबतचे काम करावे. त्यामुळे आपलाही आणि निवडणूक कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा वेळ वाया जाणार नाही, असे सांगितले.