खानापूर बार असोसिएशनची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव येथे असलेले कंझ्युमर फोरम कोर्ट कलबुर्गी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. याच्या वकील संघटनेने तहसीलदारांना निवेदन देऊन कंझ्युमर फोरम बेळगावातच राहावे, अशी मागणी केली. उपतहसीलदार कोलकार यांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवू, असे सांगितले.
गेली काही वर्षे बेळगावमध्ये असलेले कंझ्युमर फोरम कोर्ट अचानकपणे कलबुर्गी येथे स्थलांतरित करण्यात आले. याबाबत वकील संघटनेला तसेच जनतेला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला. बेळगाव जिल्हय़ाची व्याप्ती पाहता हे न्यायालय बेळगाव येथेच असणे योग्य आहे. ते वकील व सामान्य नागरिकांच्या सोयीचे होते. या न्यायालयात अनेक खटले सुरू होते. त्यामुळे नागरिकांना सोयीचे होत होते. अचानकपणे कलबुर्गी येथे हलविल्यामुळे ग्राहक व वकिलांची गैरसोय होत असून मदतीला कलबुर्गीसारख्या ठिकाणी वेळ व पैसा यांचा अपव्यय होत आहे. यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करून कंझ्युमर फोरम बेळगावातच पुन्हा ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी म्हणाले, शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास वकील संघटनेच्यावतीने आंदोलन करणार आहोत. यावेळी ज्येष्ठ वकील व्ही. एन. पाटील, ऍड. एच. एन. देसाई, ऍड. आर. एन. पाटील, ऍड. के. पी. कळ्ळेकर, ऍड. एम. व्ही. देशपांडे आदी उपस्थित होते.