पंजाब पोलिसांकडून सुरक्षा वाढविण्याची शिफारस ः दिल्ली पोलिसांनी नाकारली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खलिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे पंजाब पोलिसांचे म्हणणे आहे. पंजाब पोलिसांनी केजरीवाल यांची सुरक्षा वाढविण्याची सूचना दिल्ली पोलिसांना केली आहे. तर दिल्ली पोलिसांनी ही सूचना नाकारली आहे. दिल्ली पोलीस विभागाने केजरीवाल यांना यापूर्वीच झेड शेणीची सुरक्षा मिळाली असल्याचे म्हटले आहे.
केजरीवाल यांच्यासोबत पंजाब पोलीस विभागाचे जवान तैनात करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. तर पंजाब सरकार आणि आम आदमी पक्षाने हा आरोप नाकारला आहे.
अरविंद केजरीवाल यांना असलेल्या धोक्यासंबंधी पंजाब पोलिसांकडे कुठलेच गुप्तचर इनपूट असल्यास त्यांनी ते शेअर करावे. दिल्ली पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांना याप्रकरणी कारवाई करण्यास मदत मिळणार आहे. केजरीवाल यांच्या सुरक्षेकरता अन्य राज्यांमधून मदत नको असल्याचे दिल्ली पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधी कुठलेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा प्राप्त आहे. त्यांच्या सुरक्षेकरता पुरेसे जवान तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक महनीय व्यक्तीला असलेल्या धोक्याचा सातत्याने आढावा घेतला जातो. गरज भासल्यास केजरीवाल यांची सुरक्षा वाढविण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
केजरीवाल यांच्या सुरक्षेसंबंधी एक पत्र लिहिण्यात आले असल्याचे पंजाबमधील पोलीस अधिकाऱयाने सांगितले आहे. या पत्रात केजरीवाल यांना खलिस्तानी दहशतवाद्यांकडून असलेल्या धोक्याबद्दल सतर्क करण्यात आले आहे. हे पत्र कधी लिहिले गेले होते याची माहिती मात्र त्यांनी देणे टाळले आहे.