काँग्रेस समर्थकांना काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकीवरुन काँग्रेस समर्थकांना आवाहन केले आहे. केजरीवालांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत काँग्रेस समर्थकांनी स्वतःच्या पक्षाला मतदान करू नये असे म्हटले आहे.
पुढील महिन्यात होणाऱया विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 5 जागाही जिंकू शकणार नाही असा दावा केजरीवालांनी केला आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल काँग्रेसने स्वतःचा व्हिडिओ संदेश जारी करत केजरीवालांचा आम आदमी पक्ष म्हणजे भाजपची बी-टीम असल्याचा आरोप केला आहे.
केजरीवालांनी स्वतःच्या संदेशात काँगेसच्या पारंपरिक समर्थकांना ‘आप’ला मतदान करण्याची विनंती करत ‘काँग्रेसला मत देणे म्हणजे ते वाया घालविणे’ असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करू शकणार नाही. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 5 पेक्षाही कमी जागा मिळतील. काँग्रेसचा निवडून आलेला आमदार काही दिवसांनी भाजपमध्ये सामील होईल असा दावा केजरीवालांनी केला आहे.
केजरीवालांच्या या दाव्याला गुजरातचे काँग्रेस प्रभारी अन् राजस्थानचे आमदार रघु शर्मा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केजरीवालांचा पक्ष एकही जागा जिंकणार नाही. आम आदमी पक्ष एकही जागा जिंकू शकणार नाही असे आव्हान केजरीवालांना देत आहे. आप म्हणजे भाजपची बी टीम असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.