वृत्तसंस्था /सेंट जोन्स (अँटीग्वा)
बांगलादेश आणि विंडीज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका विंडीजमध्ये खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी विंडीज संघाची घोषणा करण्यात आली असून केमर रॉचचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका यापूर्वी बरोबरीत राहिली होती. आता विंडीज संघाची कसोटी मालिका बांगलादेश बरोबर होत आहे. पहिली कसोटी येथील व्हिव्हीयन रिचर्डस् स्टेडियमवर खेळविली जाणार असून या सामन्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज केमर रॉचचा 13 वा खेळाडू म्हणून समावेश केला आहे. मध्यंतरी दुखापतीमुळे रॉचला क्रिकेटपासून खूप दिवस अलिप्त राहावे लागले होते. विंडीजचा रॉच हा आघाडीचा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जात असून त्याने 72 कसोटीत 27 धावांच्या सरासरीने 242 गडी बाद केले आहेत. व्हिव्हीयन रिचर्डस् स्टेडियमवर रॉचने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 42 बळी मिळविले आहेत.
विंडीज संघ-क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), कँपबेल, बॉनेर, ब्लॅकवूड, मेयर्स, जे डिसिल्वा, रिफेर, जोसेफ, रॉच, गुडाकेश मोती, सिलेस, फिलीप आणि थॉमस.