तुमच्यामुळेच आम्ही सुरक्षित असा संदेश, सैन्याने उत्तरादाखल दिल्या शुभेच्छा
केरळमधील एका जोडप्याने स्वतःच्या विवाहाचे भारतीय सैन्यालाच निमंत्रण दिले आहे. निमंत्रणपत्रिकेसोबत या जोडप्याने एक सुंदर संदेशही पाठविला. यात त्यांनी सैन्याचे त्याच्या शौर्य आणि बलिदानासाठी आभार मानले आहेत. या निमंत्रणपत्रिकेला सैन्याने सोशल मीडियावर शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे.
“डियर हीरोज, आम्ही (राहुल आणि कार्तिका) विवाह करणार आहोत, देशासाठी तुमचे प्रेम, दृढसंकल्प आणि राष्ट्रभक्तीसाठी आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत. तुमच्यामुळे आम्ही निर्धास्तपणे जगू शकतो. तुमच्यामुळेच आम्ही आनंदाने विवाह करू शकत आहोत. आमच्या या विशेष दिनी तुम्हाला निमंत्रित करून आम्ही अत्यंत आनंदी आहोत. तुम्ही यावे आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी आमची इच्छा आहे’’ असे या जोडप्याने संदेशात नमूद केले आहे.


भारतीय सैन्याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर विवाहाची निमंत्रणपत्रिका शेअर केली आहे. “शुभेच्छा, आम्हाला तुमच्या विवाहसोहळय़ाकरता निमंत्रित केल्याबद्दल आम्ही राहुल आणि कार्तिकाचे आभार मानतो. दोघांचे वैवाहिक जीवन आनंद अन् समृद्धतेने भरलेले असू दे अशा आमच्या शुभेच्छा आहेत’ असे सैन्याने पोस्टमध्ये नमूद पेले आहे.


सैन्याच्या पोस्टवर अनेक लोकांनी केरळच्या या जोडप्याचे कौतुक केले आहे. हा अत्यंत चांगला विचार असल्याचे एका युजरने म्हटले आहे. लोकांनी सैन्याचे कार्य आणि निर्धाराचेही कौतुक केले. दांपत्याने सैन्याला निमंत्रण पाठविण्याचे चांगले पाऊल उचलले आणि सैन्याने निमंत्रणाला उत्तर दिले हे देखील कौतुकास्पद असे सोशल मीडिया युजर्सनी म्हटले आहे.