देशातील मुलांसाठीचे अनोखे वाचनालय, संगीत, नृत्य शिकण्यासह चित्रे रेखाटण्याची सुविधा
केरळमध्ये वाचनालयांची संस्कृती खूपच जुनी आहे. येथील अनेक शहरांना ‘वाचनालयांची शहरे’ असे संबोधिण्यात येते. सध्याच्या डिजिटल युगातही येथील लोकांकडून पुस्तकांचे वाचन आणि स्वतःची संस्कृती वाचविण्याचा प्रयत्न खरोखरच उल्लेखनीय आहे. कोट्टायम जिल्हय़ात एक चिल्ड्रन लायब्ररी सुरू करत या दिशेने प्रशंसनीय पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रत्यक्षात हे बाल वाचनालय 1969 मध्ये स्थापन करण्यात आले होते. हे वाचनालय अन्य वाचनालयांपेक्षा खूपच अनोखे आहे. या वाचनालयात दाखल होताच येथील रंगबिरंगी कलाकृतींनी व्यापून गेलेल्या भिंती लक्ष वेधून घेतात. या कलाकृती येथे येणाऱया मुलांनीच तयार केलेल्या आहेत.
या वाचनालयात सध्या 25 हजारांहून अधिक पुस्तकांचा संग्रह आहे. यातील सुमारे 14 हजार बालपुस्तके आहेत. या पुस्तकांना अनेक वर्षांपासून जमविण्यात येत आहे. कोट्टायम बाल वाचनालयाला जवाहर बाल भवन आणि कोट्टायम मुख्य वाचनालयाकडून निधी प्रदान केला जातो. याचबरोबर या वाचनालयाकडे स्वतःची दोन ऑडिटोरियम आहेत.
हे वाचनालय मुलांसाठी अभ्यासक्रमेतर घडामोडींचे केंद्र आहे. येथे कराटेपासून संगीत आणि नृत्य शिकविण्यात येते. या केंद्राचे शुल्क अधिक नसल्याने येथे मुलांना उर्वरित खासगी वर्गाच्या तुलनेत प्रवेश घेणे सोपे आहे. येथे सुमारे 250 मुले विविध अभ्यासक्रमांमध्ये भाग घेत आहेत. हे वाचनालय दरदिनी खुले असते. हे वाचनालय आता डिजिटल युगाकरता स्वतःला तयार करत आहे. लवकरच हे वाचनालय डिजिटल होणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.