वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर प्रदेशात सुमारे दोन वर्षांपासून तुरुंगात असलेला केरळचा पत्रकार सिद्दीक कप्पन याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे नमूद केले आहे. सिद्दीकला उत्तर प्रदेशच्या हाथरसला जाताना अटक करण्यात आले होते. एका 19 वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्याच्या प्रकरणाला आपल्याला टिपायचे आहे, असे त्याने त्यावेळी सांगितले होते. मल्याळी न्यूज पोर्टल अझीमुखमचा वार्ताहर असलेल्या सिद्दीकला उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरसमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती, तर सिद्दीकने आपल्याला गुंतविले जात असल्याचा दावा केला होता.