कर्नाटक, महाराष्ट्रातील लाखो भाविकांची उपस्थिती : धार्मिक कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन
चिकोडी : कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्र्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या केऊर येथील श्री मलकारी सिद्धेश्वर व श्री अरण्यसिद्धेश्वर देवाची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेच्या शेवटच्या दिवशी भंडाऱ्याच्या उधळणीत संपूर्ण भाविक भंडाऱ्यात न्हावून गेले होते. त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे पिवळा धमक असा जनसागर दिसत होता. भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत एक प्रकारचा जल्लोष व घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. य ाात्रेच्या शेवटच्या दिवशी निवाळकी व भाकणूक व दुपारी देवास अभिषेक करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. सकाळी आठ वाजता श्री मलकारी सिद्धेश्वर व अरण्यसिद्धेश्वर देवाची पालखी उठविण्यात आली. यावेळी भाविक पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत होते. देवाच्या मानकऱ्यांसह व यात्रा कमिटीच्या सदस्यांसह सवाद्य मिरवणुकीने जाऊन देवास मानाचा नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर भाविकांनी नैवेद्य अर्पण केला.
प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
मंदिर परिसरात दाखल झालेल्या भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. जिकडे पाहावे तिकडे भाविक भंडाऱ्याने माखल्यामुळे एकमेकांची ओळख पाटण्या पलीकडे दिसत होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे सर्व बाजूने जाणारे रस्ते भाविक व वाहनांच्या गर्दीमुळे भरून गेले होते. येथील प्रमुख रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होत होती. भाविकांची प्रचंड गर्दी व भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीमध्ये भाविकांना रस्ता शोधण्यास खूपच परिश्र्रम घ्यावे लागत होते. पाच दिवस चाललेल्या या यात्रेत विविध शर्यती व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्वच स्पर्धा व शर्यतीत कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अनेक स्पर्धक व शर्यत शौकिनांनी भाग घेतला होता.