भारतीय उच्चायुक्तालयातील तिरंगा उतरवला ः मोठा तिरंगा फडकावत भारताचे चोख प्रत्युत्तर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
खलिस्तानवादी अमृतपाल सिंग यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड केल्याची घटना उघड झाली आहे. तसेच तेथील तिरंगा खाली उतरवून तेथे खलिस्तानचा झेंडा फडकावल्याचा प्रकारही निदर्शनास आला आहे. ब्रिटनमधील ही घटना ताजी असतानाच अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय वाणिज्य दुतावासावरही सोमवारी हल्ला झाला. या दोन्ही घटनांचा भारताने कडक शब्दात निषेध नोंदवला आहे.
ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाबाहेर रविवारी संध्याकाळी शेकडो खलिस्तान समर्थक जमले होते. यावेळी त्यांनी इमारतीत घुसून भारतीय तिरंगा उतरवला. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात पोहोचलेल्या लोकांच्या हातात खलिस्तानी ध्वज आणि अमृतपाल सिंग यांचे पोस्टर होते. पोस्टर्सवर ‘फ्री अमृतपाल सिंग’ ‘आम्हाला न्याय पाहिजे’ आणि ‘आम्ही अमृतपाल सिंग यांच्या पाठीशी आहोत’ अशा आशयाचा मजकूर दिसून येत होता. या सर्व प्रकारावर भारताने तीव्र आक्षेप घेत दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तांना बोलावून घेतले. तसेच भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानींच्या उपद्रवानंतर भारताने आता चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता उच्चायुक्तालय इमारतीवर मोठा तिरंगा फडकवण्यात आला आहे. पंजाब पोलीस खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगवर कारवाई करत असल्याने रविवारी लंडनमध्ये उपस्थित असलेल्या काही खलिस्तान समर्थकांनी याला विरोध केला.
अमेरिकेत भारतीय वाणिज्य दुतावासावरही हल्ला
लंडननंतर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्येही भारतीय वाणिज्य दुतावासावर हल्ला झाला. शेकडो खलिस्तान समर्थकही येथे जमले होते. त्यांनी स्प्रे पेंट्सने ‘अमृतपालला मुक्त करा’ असे लिहिले. या लोकांनी वाणिज्य दुतावासात घुसत खलिस्तानचे झेंडे लावले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय अमेरिकन नागरिकांनी केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून कडक शब्दात निर्देश
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही घटनांचा तीव्र निषेध केला. उच्चायुक्त कार्यालय आणि दुतावासाबाहेर पुरेशी सुरक्षा का नव्हती? खलिस्तानी आत कसे घुसले. ब्रिटनमधील आपल्या मुत्सद्दी आणि दुतावासाच्या सुरक्षेबाबत ब्रिटिश सरकारची ही वृत्ती सहन करण्यापलीकडे आहे. हे व्हिएन्ना अधिवेशनाच्या नियमांचे उल्लंघन आहे. यावर तातडीने कारवाई करून आरोपींना अटक होईल, अशी आशा आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
दिल्लीत शीखांची निदर्शने
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात रविवारी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा सोमवारी नवी दिल्लीत निषेध करण्यात आला. लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी उच्चायुक्तालयातील तिरंगा काढून टाकल्यानंतर नवी दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर मोठय़ा संख्येने शीख जमा झाले होते. त्यांनी खलिस्तानींच्या कृतीचा निषेध केला. ‘भारत हा आपला स्वाभिमान आहे. तिरंग्याचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही’ असे ते यावेळी म्हणाले.