वृत्तसंस्था/ शिमला
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना धमकी दिली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला समर्थन न करण्याची सूचना गुरपतवंतने मुख्यमंत्र्यांना केली आहे. राहुल गांधी हे 1984 च्या नरसंहारातील गुन्हेगारांचा बचाव करत असल्याचे खलिस्तानी दहशतवाद्याने एक पत्र प्रसारित करत म्हटले आहे. पत्र पन्नूने हिमाचलच्या पत्रकारांना ईमेलद्वारे पाठविले आहे. 1984 च्या दंगलीचे गुन्हेगार कमलनाथ आणि जगदीश टायटलर यांना काँग्रेस पाठिशी घालत आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी भारत जोडो यात्रेचे समर्थन करू नये तसेच यात्रेपासून दूर रहावे. अन्यथा जीव घेऊ अशी धमकी पन्नूने पत्राद्वारे दिली आहे. तसेच शिमला हे शहरच खलिस्तानची राजधानी राहणार असल्याचा दावा दहशतवाद्याने पत्रात केला आहे. 10 जानेवारी रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचणार आहे.