अटकेसाठी दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू
वृत्तसंस्था अमृतसर
पंजाबमध्ये सलग दुसऱ्या दिवशी खलिस्तानवादी समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या अटकेसाठी पोलीस शोधमोहीम सुरू असतानाच त्याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. अमृतपालच्या अटकेसाठी व्यापक मोहीम सुरू असली तरी त्याला अद्याप यश आलेले नाही. वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडून शोध सुरू असतानाच आता या प्रकरणात एनआयए दाखल होऊ शकते.
पंजाबमध्ये खलिस्तानी समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपालचा शोध रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होता. त्याच्या अटकेसाठी पंजाब पोलिसांनी राज्यात मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. शनिवारी अमृतपालला अटक करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच तो पोबारा करण्यात यशस्वी ठरला होता. साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले असले तरी दोन दिवसांनंतरही अमृतपाल पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. सद्यस्थितीत साथीदारांच्या चौकशीतून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आणखी एक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालने आनंदपूर खालसा फोर्स (एकेएफ) तयार करण्याची तयारी केली होती. त्याच्या घरातून आणि साथीदारांकडून जप्त केलेल्या शस्त्रांवर ‘एकेएफ’ लिहिलेले आढळले. अमृतपालच्या जवळच्या साथीदारांकडून 100 हून अधिक अवैध काडतुसे सापडली आहेत. चौकशीत अमृतपालने ही काडतुसे दिल्याची कबुली त्यांनी दिल्याचे अमृतसर ग्रामीण एसएसपी सतींदर सिंह यांनी सांगितले.
शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल
अमृतसर पोलिसांनी अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृतपालच्या 7 साथीदारांना शनिवारी जालंधरमधील मेहतपूर येथून पकडण्यात आले. यामध्ये गुरलाल सिंग, सवरीत सिंग, अमनदीप सिंग, हरमिंदर सिंग, बलजिंदर सिंग, गुरवीर सिंग आणि अजयपाल सिंग यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांना 12 बोअरच्या 6 रायफल आणि 193 काडतुसे सापडली. ही सर्व अवैध शस्त्रे आहेत. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपालच्या 4 साथीदारांना आसाममधील दिब्रुगड येथे नेले आहे. त्यांना आसाममधील कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
अमृतपाल, फायनान्सरवर ‘एनएसए’ अंतर्गत कारवाई?
अमृतपालचे आयएसआयशी संबंध असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाल्यानंतर केंद्राला सतर्क करण्यात आले आहे. अमृतपालला परदेशातून निधी आल्याचाही संशय असल्यामुळे या प्रकरणात तपासासाठी एनएसए दाखल होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर ‘एनएसएस’ अंतर्गत कारवाई होऊ शकते. अमृतपालचा फायनान्सर दलजीत सिंग कलसी याला अटक करण्यात आली आहे. तो एक अभिनेता आणि निर्माता आहे.
शेकडो जणांवर कारवाई
पोलिसांनी आतापर्यंत ‘वारीस पंजाब दे’शी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक केली आहे. 8 रायफल आणि रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आले आहे. शनिवारी अमृतपालला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमृतपालच्या अटकेची माहिती शनिवारी दुपारी मिळाली, मात्र रात्री उशिरा पोलिसांनी तो फरार असल्याची माहिती दिली. त्यांची कार नकोदर येथे उभी असल्याचे आढळून आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालचा मोबाईल फोनही याच वाहनात सापडला आहे.
मोबाईल इंटरनेट बंदीमध्ये वाढ
पंजाब पोलिसांची वारिस पंजाबचे प्रमुख अमृतपाल सिंह यांच्याविरोधात रविवारीही शोधमोहीम सुरूच आहे. आता पंजाबमध्ये 20 मार्चपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. सुऊवातीला पंजाबमध्ये रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. आता इंटरनेट बंदी आणखी वाढवण्यात आली आहे.