Tarun Bharat

खलिस्तानवादी अमृतपालची कोंडी

अटकेसाठी सापळा : 9 साथीदार जाळ्यात, 78 समर्थकांनाही अटक : सावधगिरीसाठी पंजाबमध्ये इंटरनेट बंद

वृत्तसंस्था / चंदीगढ

खलिस्तान समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या 9 साथीदारांना पंजाब पोलिसांनी शनिवारी अटक केली. तसेच अमृतपालला जालंधरच्या नकोदर भागातून अटक करण्यात आल्याची माहिती सुरवातीला देण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत या वृत्ताला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा देण्यात आला नाही. अजनाळा पोलीस ठाण्यावरील हल्ल्याशी संबंधित गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर 3 गुन्हे दाखल असून 2 द्वेषपूर्ण भाषणाशी संबंधित आहेत. दरम्यान, अमृतपालच्या अटकेनंतर राज्यातील वातावरण भडकू नये किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवा टाळण्यासाठी पंजाबमध्ये रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे.

पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अमृतपाल याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. ‘वारीस पंजाब दे’चे प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी जवळपास 50 पोलीस वाहने तैनात करण्यात आली होती. अमृतपालच्या 6 साथीदारांना शनिवारी दुपारी अमृतपालसोबत जालंधरहून मोगाच्या दिशेने जात असताना अटक करण्यात आली. याशिवाय अमृतपालच्या दोन साथीदारांना अमृतसरमधील वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. यामध्ये बलसारण जोधा गावातील हरमेल सिंग जोध आणि शेरो गावातील हरचरण सिंग यांचा समावेश आहे. नववा व्यक्ती मोगा येथील भगवंत सिंग उर्फ बोजेके असून त्याला त्याच्या शेतातून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या अमृतपालच्या साथीदारांकडून पोलिसांनी अनेक शस्त्रे जप्त केली आहेत. दरम्यान, दिवसभर चाललेल्या या व्यापक मोहिमेत त्याच्या 78 समर्थकांना अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी रात्री उशिराने स्पष्ट केले.

दिवसभर पाठलाग

पंजाब पोलिसांनी गराडा घालताच अमृतपाल स्वत: कारमध्ये बसून लिंक रोडने पळून गेला. सुमारे 100 पोलिसांच्या वाहनांनी त्याचा पाठलाग करून जालंधरच्या नकोदर परिसरातून त्याला पकडल्याची माहिती व्हायरल झाली होती. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा सुरक्षा दलाकडून मिळाला नाही. त्यांच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओही शेअर केले असून पोलीस त्यांचा पाठलाग करत असल्याचे दिसून येत आहे. अमृतपालचा ताफा शनिवारी दुपारी एकच्या सुमारास जालंधरच्या मेहतपूर शहराजवळ पोहोचताच पोलिसांनी नाकाबंदी केली. ताफ्यात सर्वात पुढे असलेल्या 2 वाहनांमधून प्रवास करणाऱ्या 6 जणांना पकडण्यात आले. अमृतपालची मर्सिडीज कार ताफ्यात तिसऱ्या क्रमांकावर होती. पोलिसांना पाहताच त्याच्या चालकाने गाडी लिंक रोडच्या दिशेने वळवून पळ काढला. जालंदर आणि मोगा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.

जालंधर-मोगा पोलिसांची संयुक्त कारवाई

अमृतपालने शनिवारी जालंधर-मोगा राष्ट्रीय महामार्गावर शाहकोट-मलसिया भागात आणि भटिंडा जिह्यातील रामपुरा येथे कार्यक्रम आयोजित केले होते. यादरम्यानच जालंधर आणि मोगा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुप्तपणे अमृतपालला अटक करण्याची रणनीती आखली होती. त्यासाठी जवळपासच्या अनेक जिह्यांतून रात्रभर पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. जालंधर-मोगा राष्ट्रीय महामार्गावरही सकाळपासून नाकाबंदी करण्यात आली होती.

इंटरनेट ब्लॉक, एसएमएस सेवा बंद

अमृतपालच्या अटकेनंतर पंजाबमध्ये मोबाईल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती. यासंबंधीचे आदेश पंजाबच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी जारी केले आहेत. सोशल मीडिया आणि बल्क एसएमएसद्वारे पंजाबमध्ये लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असा इशारा पंजाबच्या डीजीपींनी दिल्यानंतर राज्यातील मोबाईल इंटरनेट आणि बल्क एसएमएस सेवा शनिवारी दुपारी 12 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकिंग आणि मोबाईल रिचार्ज वगळता इतर सर्व एसएमएस सेवा बंद राहतील.

अमृतपालच्या गावात केंद्रीय फौज तैनात

अमृतपाल सिंगविरोधातील कारवाईदरम्यान पंजाब पोलिसांनी अमृतसर जिह्यातील रैयाजवळील जल्लूपूर खेडा या गावालाही वेढा घातला. गावात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून वाहनांची झडती घेतली जात होती. पंजाब पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय दलाचे जवानही जल्लूपूर खेड्याभोवती तैनात करण्यात आले आहेत. मोहाली सीमेवर सुरू असलेल्या इन्साफ मोर्चाने आता अमृतपाल सिंगच्या अटकेचा निषेध सुरू केला आहे. 

‘वारीस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपालवर 3 गुन्हे दाखल असून त्यापैकी दोन प्रकरणे अमृतसर जिह्यातील अजनाळा पोलीस ठाण्यात आहेत. आपल्या एका जवळच्या मित्राच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या अमृतपालने त्याच्या समर्थकांसह 23 फेब्रुवारी रोजी अजनाळा पोलीस स्टेशनवर हल्ला केला. याप्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याने पंजाब पोलिसांवर बरीच टीका सुरू होती.

Related Stories

सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त

Patil_p

भाजपकडून सोनोवाल, मुरुगन यांना उमेदवारी

Patil_p

काँगेस उत्तर प्रदेशात स्वबळावर लढणार

Patil_p

कोरोनाकाळात जगभरात 15 लाख मुले अनाथ

Patil_p

ट्रम्प यांच्यासमवेत इव्हांकाही येणार

tarunbharat

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होऊ शकत नाहीत

datta jadhav