Tarun Bharat

खानापूरचे शासकीय रुग्णालय होणार शंभर खाटांचे

महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद : 3212 रुग्णांनी घेतला लाभ : आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱयांचे विशेष प्रयत्न

प्रतिनिधी /खानापूर

खानापूर तालुक्याच्या प्रत्येक गावात आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी शिक्षिकांनी केलेल्या प्रयत्नांना तोड नाही. यामुळेच कोरोना संसर्ग रोखण्यात तालुका आघाडीवर राहिला आहे. तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्यात अधिक गती प्राप्त व्हावी, यासाठी रुग्णालयाचा दर्जा वाढवून आता शंभर खाटांचे रुग्णालय होणार आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी येथील सरकारी दवाखान्याच्या आवारात सोमवारी महाआरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करताना केले.

त्या म्हणाल्या, सरकारी दवाखाना आवारात एमसीएच हॉस्पिटल इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी प्रसूती महिला व लहान मुलांसाठी 60 खाटांचे रुग्णालय होणार आहे. तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर व तालुक्यातील आरोग्य कर्मचारी विशेष प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी

प्रारंभी बालरोगतज्ञ डॉ. पवन यांनी स्वागत केले. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वर गडाद यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ते म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱया आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचवावा, यासाठी तालुका पातळीवर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून सांसर्गिक व असांसर्गिक रुग्णांची तपासणी करून सल्ला दिला जाणार आहे. आवश्यक त्या रुग्णांना औषधोपचारही केले जाणार आहेत. 

क्षयरोग, मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रोगांविरुद्ध प्रतिबंधक औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमात हेल्थ कार्ड, आयुष्मान भारत कार्डचे वितरण केले. कुपोषित बालकांना पैष्टिक आहार व औषधे देण्यात आली. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष मजहर खानापुरी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक मेघा कुंदरगी, डॉ. संजय डुमगोळ, डॉ. श्रीकांत सोनोळी, डॉ. अनिल, रमेश पल्लेद, मुख्याधिकारी बाबासाहेब माने, क्षेत्रशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी, डॉ. शिवाजी मल्लेण्णावर उपस्थित होते.

शिबिराला मिळाला उदंड प्रतिसाद  

या शिबिरात दिवसभरात 3212 जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांबरोबरच त्यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, क्षयरोग, मलेरिया, हाडांच्या रोगाने ग्रासलेल्या रुग्णांचाही समावेश होता. गरोदर महिला, लहान बालके यांचीही शिबिरात तपासणी करण्यात आली. या शिबिरात केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती देण्यासाठी विविध स्टॉलची उभारण्यात आली होती.

 केंद शासनाच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱया आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधांची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तज्ञ डॉक्टरांकडून रुग्ण तपासणीनंतर त्यांना औषधांचा पुरवठा करण्यात आला. अद्याप बऱयाच जणांनी आयुष्मान भारत योजनेचे कार्ड करून घेतले नव्हते. या शिबिरातील सर्व योजनांसंदर्भात तालुक्यात आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका यांच्याकडून घरोघरी जावून प्रसार करण्यात आला होता.

Related Stories

ट्रकच्या ठोकरीने अनोळखी वृद्धाचा मृत्यू

Patil_p

काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटकून कामाला लागावे

Amit Kulkarni

हृदयाचा हृदयाशी संवाद सुरू ठेवा….! डॉ. एम. डी. दीक्षित

Amit Kulkarni

होनकल-अनमोड महामार्ग दुपदरीकरण कामाला प्रारंभ

Amit Kulkarni

पाठय़पुस्तक वितरणास प्रारंभ

Amit Kulkarni

महाराष्ट्रातही पाळण्यात यावा काळा दिन

Patil_p
error: Content is protected !!