वार्ताहर/हिंडलगा
उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रा मोठ्या प्रमाणात काढल्या गेल्या होत्या. त्याचे अनुकरण लक्ष्मीनगर हिंडलगा येथील रहिवासी व उद्योजक सोमनाथ सुनील मुंगारे यांनी खानापूर येथील मलप्रभा नदी ते देवरवाडी येथील वैजनाथ मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी खानापूर येथील पवित्र मलप्रभा नदी या ठिकाणाहून कावड यात्रेला प्रारंभ करण्यात आला. प्रथम या ठिकाणी मलप्रभा नदीचे पूजन करून 25 लिटर पाणी गंगा कलशात घेऊन कलशाची पूजा करण्यात आली. तेथून पायी चालत ही यात्रा खानापूरमार्गे सोमवारी बेळगावात येऊन पोहोचली. तेथून लक्ष्मीनगर हिंडलगा या ठिकाणी आली असता या ठिकाणी वडील सुनील मुंगारे व आई लीला मुंगारे यांनी गंगाकलश असलेल्या कावडची पूजा केली.
या ठिकाणी कल्लाप्पा पाटील व ग्रा. पं. सदस्य गजानन बांदेकर यांनी या कावड यात्रेला शुभेच्छा दिल्या. तेथून ही कावड हिंडलगामार्गे देवरवाडी येथील वैजनाथ मंदिरात संध्याकाळी जाऊन पोहोचली. त्यानंतर रात्री आठ वाजता वैजनाथ देवस्थानातील पिंडीवर मलप्रभा नदीच्या पाण्याचा अभिषेक घालण्यात आला. हिंडलगा, सुळगा, तुरमुरी, बाची, देवरवाडी या ठिकाणी भाविकांनी या ’कावड’ची पूजाअर्चा करून शुभेच्छा दिल्या. देवरवाडी येथील वैजनाथ मंदिरात अभिषेक, पूजा-अर्चा करून या कावडयात्रेची सांगता झाली. प्रथमच बेळगाव जिह्यातील लक्ष्मीनगर हिंडलगा येथून अशाप्रकारची कावड यात्रा काढल्यामुळे या भागातील भाविकांतून कौतुक होत होते.