तिसरी कसोटी दुसरा दिवस : ऑस्ट्रेलिया प. डाव 4 बाद 475, ख्वाजा द्विशतकाच्या समीप, स्मिथचे शतक


वृत्तसंस्था /सिडनी
सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या तिसऱया आणि शेवटच्या कसोटीतील खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 4 बाद 475 धावांचा डोंगर उभा केला. उस्मान ख्वाजा 195 धावांवर खेळत आहे. सिडनीच्या मैदानावर सलग तिसरे शतक झळकविणारा उस्मान ख्वाजा हा चौथा फलंदाज आहे.
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सलग सामने जिंकून मालिका यापूर्वीच हस्तगत केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आता या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा व्हाईटवॉश करण्यासाठी सज्ज झाला आहे. या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 2 बाद 147 या धावसंख्येवरून गुरुवारी खेळाच्या दुसऱया दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि दिवसअखेर त्यांनी 131 षटकात 4 बाद 475 धावा जमविल्या. या सामन्यात स्टिव्ह स्मिथने शानदार शतक (104) तर लाबुशेन आणि हेड यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
खेळाच्या पहिल्या दिवशी वॉर्नर आणि लाबुशेन हे दोन फलंदाज बाद झाले होते. उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ या जोडीने गुरुवारी दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 209 धावांची भागीदारी केली. डावखुऱया ख्वाजाने उपाहारापूर्वीच रबाडाच्या गोलंदाजीवर फटका मारत आपले तेरावे कसोटी शतक झळकविले. सिडनीच्या मैदानावर आता अनेक विक्रम नोंदविले गेले आहेत. या मैदानावर सलग तीन शतके झळकविणारा उस्मान ख्वाजा हा चौथा फलंदाज आहे. या मैदानावर यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे वॅली हॅमंड, डग वॉल्टर्स आणि भारताच्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने अशी कामगिरी केली आहे. उस्मान ख्वाजाने गेल्या वषी ऍशेस मालिकेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावात शतके या मैदानावर नोंदविली होती.
स्मिथचे 30 वे शतक
केशव महाराजने स्टीव्ह स्मिथला आपल्याच गोलंदाजीवर टिपले. त्याने 192 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 104 धावा झळकविल्या. स्टीव्ह स्मिथचे कसोटीतील हे तिसावे शतक असून त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे दिवंगत क्रिकेटपटू सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकला. स्मिथने आपल्या घरच्या मैदानावरच हे शतक गुरुवारी झळकविले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 109 व्या षटकामध्ये स्मिथने नॉर्त्जेच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून हे शतक 190 चेंडूत पूर्ण केली. सर ब्रॅडमन यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 29 शतके झळकविली होती. ब्रॅडमन यांचा हा विक्रम स्टीव्ह स्मिथने मागे टाकला तर ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर मॅथ्यू हेडनच्या विक्रमाशी बरोबरी केली. मॅथ्यू हेडनने आपल्या कसोटी कारकीर्दीत 30 शतके झळकविली होती. आता ऑस्ट्रेलियातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके नोंदविणाऱया फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार रिकी पाँटिंग 41 शतकांसह पहिल्या, माजी कर्णधार स्टीव्ह वॉ 32 शतकांसह दुसऱया स्थानावर आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके नोंदविणाऱया फलंदाजांत स्टीव्ह स्मिथ आता नवव्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने या यादीत पहिले स्थान कायम राखले असून सध्या खेळणाऱया क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली 72 शतके, डेव्हिड वॉर्नर 45 शतके, जो रुट 44 शतके, स्टीव्ह स्मिथ 42 शतके, रोहित शर्मा व केन विल्यम्सन प्रत्येकी 41 शतके यांचा क्रमांक लागतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ आता ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल क्लार्कला मागे टाकले आहे. स्मिथने 92 कसोटीतील 162 डावात 60.89 धावांच्या सरासरीने 8 हजार 647 धावा जमविल्या असून त्यामध्ये 30 शतके आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच कसोटीत त्याने 239 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदविली आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक धावा जमविणाऱया फलंदाजांच्या यादीत रिकी पाँटिंग 13 हजार 378 धावांसह पहिल्या, ऍलन बोर्डर 11 हजार 174 धावांसह दुसऱया, स्टीव्ह वॉ 10 हजार 927 धावांसह तिसऱया, स्टीव्ह स्मिथ 8 हजार 647 धावांसह चौथ्या, मिचेल क्लार्क 8 हजार 643 धावांसह पाचव्या स्थानावर आहेत. सिडनीच्या मैदानावर स्मिथने दहा सामन्यातून पंधरा डावात 1 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याने या मैदानावर 72.64 सरासरीसह 1 हजार 17 धावा जमविल्या आहेत. या मैदानावर स्मिथची 131 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने या मैदानावर 4 शतके आणि 7 अर्धशतके नोंदविली आहेत. सिडनीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सर्वाधिक धावा नोंदविल्या असून त्याने 16 सामन्यातून 27 डावात 67.27 धावांच्या सरासरीने 1480 धावा जमविल्या आहेत. त्यामध्ये 6 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव 131 षटकात 4 बाद 475 (उस्मान ख्वाजा खेळत आहे 195, वॉर्नर 10, लाबुशेन 79, स्टीव्ह स्मिथ 104, हेड 70, रेनशॉ खेळत आहे 5, नॉर्जे 2-55, रबाडा 1-119, केशव महाराज 1-108).
ख्वाजाचा विक्रम
36 वषीय उस्मान ख्वाजाने 2022 च्या क्रिकेट हंगामात 11 सामन्यातून 67.50 धावांच्या सरासरीने 1080 धावा जमविल्या आहेत. तसेच आयसीसीच्या 2022 च्या क्रिकेट हंगामातील कसोटी या क्रीडा प्रकारात सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी आता उस्मान ख्वाजा, दक्षिण आफ्रिकेचा रबाडा, इंग्लंडचे बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात दिवसअखेर उस्मान ख्वाजा 1 षटकार आणि 19 चौकारांसह 195 धावांवर तर रेनशॉ 5 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या टेविस हेडला रबाडाने झेलबाद केले. त्याने 1 षटकार आणि 8 चौकारांसह 70 धावा झळकविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे नॉर्जेने 2 तर रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.