क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मंडय़ा येथे कर्नाटक अमॅच्युअर खो-खो संघटना व कर्नाटक युवजन क्रीडा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत हावेरी जिल्हा संघाने बेळगाव जिल्हा संघाचा आठ गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत बेळगाव संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी मुलींचा संघ पात्र ठरला आहे.
बेळगाव जिल्हा संघाने पहिल्या सामन्यात म्हैसूर संघाचा 2 गडय़ांनी पराभव केला. दुसऱया सामन्यात बेळगाव संघाने गदग संघाचा 8 गडय़ांनी, तिसऱया सामन्यात धारवाड संघाचा 1 डाव व 5 गडय़ांनी पराभव करून आपल्या गटात अव्वल स्थान मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने बेंगळूर संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र हावेरी संघाने बेळगाव जिल्हा संघाचा 8 गडय़ांनी पराभव केला. पहिल्या डावात बेळगाव संघाने हावेरीचा एक गडी टिपला तर हावेरी संघाने बेळगाव संघाचे 11 गडी टिपले. दुसऱया डावात बेळगाव संघाने 4 तर हावेरीने बेळगावचे 6 गडी टिपले. या सामन्यात मेघा नाडगौडा, आश्मा अलीखान व अदिती बिजगरकर यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या हावेरी संघाला व उपविजेत्या बेळगाव जिल्हा संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. या संघाला हल्लोळी, नितीन नाईक व महेश सिद्दानी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. बेळगावचा संघ बेंगळूर येथे होणाऱया मिनी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.