ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Shiv Sena’s criticism of Shinde group : जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत. हरामखोरी हाच त्यांचा धर्म आहे. या खोके हरामांचे अस्तित्व फार काळ राहणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने सामना या मुखपत्रातून शिंदे गटावर जहरी टीका केली आहे.
राज्यात यंदा पाऊसही तुफान झाला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी मागणी करूनही सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. येथे सर्व सत्ताभोगी असून जनहिताच्या बाबतीत त्यांच्या अकलेचाच दुष्काळ पडला आहे. हा अकलेचा दुष्काळ शेवटचे दोन दिवस सभागृहातून विधानसभेच्या पायऱयांवर आला. पण खोकेछाप शिंदे गटाचा खरा चेहरा उघड झाला, अशी खिल्लीही शिवसेनेने उडवली आहे.
अधिक वाचा : देशात 21 बोगस विद्यापीठे, महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश
मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’ म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच. बिहारात राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा.
पूर्वी तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादूर वगैरे उपाध्या लावल्या जात. पण शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे यापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल. अगदी सहज सोप्या भाषेत हा विषय समजवायचा तर ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था! आणि त्याने महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली!’ हा शिक्का पुसता येणे कठीण आहे. ही सल मनात टोचत असल्यामुळेच दोन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार सभागृह सोडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले व आम्ही ‘खोकेवाले नाही. आम्हाला खोकेवाले म्हणू नका’ असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहिले.