सात वर्षे 100 टक्के निकाल देऊनही शासनाचे दुर्लक्ष, पूर्णवेळ शिक्षक तीनच, इमारतीचे दुरुस्तीकाम रखडले
प्रतिनिधी /काणकोण
मागची सतत सात वर्षे दहावीचा 100 टक्के निकाल देणाऱया खोतीगावच्या शासकीय माध्यमिक विद्यालयाकडे शासनाचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असून मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक आणि संगणक शिक्षक अशा तीन कायम शिक्षकांना घेऊन या शाळेचा रथ मागच्या कित्येक वर्षांपासून चालविला जात आहे.
5 वी ते 10 पर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेत बाकीचे शिक्षक एक तर कंत्राटी पद्धतीवर अथवा रोजंदारीवर काम करत आहेत. त्यापैकी काही शिक्षक मागच्या 8 ते 10 वर्षांपासून या शाळेत काम करत असून कधी तरी कायमस्वरूपी नियुक्ती मिळेल या आशेवर ते आपले विद्यादानाचे काम प्रामाणिकपणाने करून शाळेला नाव मिळवून देण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.
पंचायत क्षेत्रातील एकमेव व बहुसंख्य आदिवासी समाजातील मुले शिकत असलेल्या या माध्यमिक शाळा इमारतीच्या दुरुस्तीचे काम 2018 साली सुरू करण्यात आले होते. मागच्या चार वर्षांत हे काम पूर्ण झालेले नसून जुन्या इमारतीच्या पाच खोल्यांचे काम अजून पूर्ण झालेले नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून एका मोठय़ा खोलीचे दोन भाग करून वर्ग चालविण्याची पाळी मुख्याध्यापकांवर आलेली आहे. उन्हाळय़ात ठीक आहे, पण आता पावसाळय़ात दिवस कसे घालवायचे या चिंतेत शिक्षकवर्ग पडला आहे.
खेतीगावचा मोबाईल टॉवर कार्यान्वित नसल्यामुळे या पंचायत क्षेत्रातील इंटरनेट सेवा पूर्णपणे कोलमडली होती. आता हा मनोरा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारने या शाळेला एका खासगी कंपनीची इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र वारंवार खंडित होणाऱया सेवेमुळे परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. सध्या बहुतेक कामे पेपरलेस झालेली असून ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. अशा वेळी ही सेवाच या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सध्या खोतीगावचा मनोरा कार्यान्वित झालेला असल्याने ही परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा शिक्षक, पालक व विद्यार्थी बाळगून आहेत.
ज्या शाळेतील शिक्षक 100 टक्के निकाल देण्यासाठी धडपडतात त्या शाळेला पूर्णवेळ आणि विषयवार नीट शिक्षक देण्याकडे तसेच शाळेच्या इमारतीचे रखडलेले काम पूर्ण करण्याकडे सभापती तथा काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.