वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरु असलेल्या 2022-23 च्या बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेतील शुक्रवारच्या सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सने सिडनी थंडरचा डाव केवळ 15 धावात गुंडाळला.
2015-16 साली झालेल्या या स्पर्धेत सिडनी थंडरने अजिंक्यपद पटकाविले होते. शुक्रवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऍडलेड स्ट्रायकर्सने 20 षटकात 9 बाद 139 धावा जमविल्या. त्यानंतर सिडनी थंडरचा डाव 5.5 षटकात 15 धावात संपुष्टात आल्याने ऍडलेड स्ट्रायकर्सने हा सामना 124 धावांनी जिंकला. या स्पर्धेत यापूर्वीची निचांकी धावसंख्या 21 अशी नोंदविली गेली होती. शुक्रवारच्या सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सच्या वेस ऍगरने 6 धावात 4 बळी तर थॉर्नटनने 5 धावात 3 गडी बाद केले. शॉर्टने 5 धावात 1 गडी बाद केला. थॉर्नटनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.