वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहन निर्माता कंपनी किया इंडियाने आपल्या युटिलिटी वाहन प्रकारातील ‘केरेन्स’ यांच्या 44,174 युनिट्स परत मागवल्या आहेत. सदरच्या वाहनात दोष आढळला आहे.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, एक जबाबदार कंपनी असल्याने केरेन्स वाहनात दोष आढळून आला असून परिणामी या गाडय़ा परत मागवून त्यांची तपासणी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. एअरबॅग्स ऑपरेट करणाऱया सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी आढळल्या असून त्या दूर केल्या जाण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
या दरम्यान किया इंडियाने सांगितले की, वाहन मालकांना केरेन्स मॉडेलची ही युनिट्स अधिकृत डिलर्सकडे स्वेच्छेने घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली आहे. कंपनीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये कियाने सहा आणि सात सीटर मॉडेल केरेन्स लाँच केले होते. याच गाडय़ांचा परत मागवण्यात येणाऱया वाहनांमध्ये समावेश राहणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.