’क्रीडा’मंत्र्यांची अनोखी ’खेळी’, 3 कोटींचे बिल मंजूर करण्यास नकार दिल्याचा परिणाम ?
जय नाईक/ पणजी
कला अकादमी बांधकाम प्रकरण, नागरी पुरवठा खात्यातील अन्नधान्य नासाडी, आणि तूरडाळ प्रकरण झाल्यानंतर आता मंत्री गोविंद गावडे यांच्या क्रीडा खात्यातही गोंधळ आणि भ्रष्टाचार होत असल्याचे वृत्त हाती आले असून गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक अजय गावडे यांची तडकाफडकी त्या पदावरून उचलबांगडी केल्याने या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याच्या दाट शक्यतेने एकच खळबळ माजली आहे.
या ताज्या प्रकरणामुळे मंत्री गोविंद गावडे यांची अडचण वाढण्याची शक्मयता आहे. कला व संस्कृती खाते, नागरी पुरवठा खाते ही अगोदर दोन्ही खाती सांभाळणाऱया मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे यावेळी क्रीडा व युवा व्यवहार खाते आले आहे, मात्र आता क्रीडा खात्यातही गोंधळ निर्माण झाला असून कंत्राटदारास तीन कोटी रुपये अदा करण्यावरून मंत्री गावडे यांच्यावर आरोप केले जात आहेत.
कोटय़वधींच्या आर्थिक घोटाळ्यात अडकल्याचा कथित आरोप असलेले कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या क्रीडा खात्यातही कोटय़वधींचा कथित आर्थिक घोटाळा घडल्याचे वृत्त असून त्यातूनच गोवा क्रीडा प्राधिकरणाचे (साग) कार्यकारी संचालक अजय गावडे यांची उचलबांगडी झाल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
या प्रकारामुळे मंत्री गोविंद गावडे यांच्याकडे असलेल्या कला संस्कृती खाते, नागरी पुरवठा खाते आणि आता क्रीडा खाते या तिन्ही खात्यांना भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे उघड झाले आहे. यातील पहिल्या दोन खात्यांमध्ये घडलेल्या कथित घोटाळ्यांसाठी मंत्री गावडे यांनी इतरांकडे बोट दाखविण्याचे प्रयत्न केले होते. एवढेच नव्हे तर कला अकादमी दुरुस्तीप्रकरणी मंत्रिमंडळाला दोष देण्याचा प्रयत्न केला होता, तर नागरी पुरवठा धान्य घोटाळ्यासाठी खुद्द संचालकालाच दोषी ठरविले होते. आता ‘क्रीडा’ खात्यातील कथित घोटाळ्यातून स्वतःला सावरण्यासाठी ते कोणती ‘खेळी’ खेळतात याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार सदर कथित घोटाळा सुमारे तीन कोटी रुपयांचा असून त्याचे बिल मंजूर करण्यास नकार दिल्यामुळे अजय गावडे यांची हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या ’फिफा’ महिलांच्या विश्वचषकाशी संबंधित बॅनर आणि होर्डिंग्ज राज्यभरात लावण्याचे कंत्राट प्राप्त केलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने सदर 3.04 कोटींचे बिल सादर केले होते.
ते बिल मंजूर करण्यासाठी मंत्र्यांच्या घनिष्ठ मर्जीतील एक तरुण अजय गावडे यांच्यावर जोरदार दबाव आणत होता. परंतु प्रत्येकवेळी इतरांच्या माथी खापर फोडण्याची मंत्र्यांची कार्यपद्धती पाहता आपणही ‘बळीचा बकरा’ होऊ, या भीतीने सदर अधिकाऱयाने ते बिल मंजूर करण्यास साफ नकार दिला. एखाद्या मंत्र्याला खूश करण्यासाठी सरकारी अधिकारी स्वतःची कारकीर्द धोक्मयात का घालेल? म्हणूनच 3.04 कोटी रुपयांच्या बिलाचे समर्थन त्यांनी केले नाही. मंत्र्यांचे आदेश न पाळल्यास नाराज होणे साहजिकच असते, पण अखेरीस अधिकारीच संकटात सापडतात हा इतिहास आहे.
दरम्यान, या प्रकरणी ‘साग’ चे कार्यकारी संचालक अजय गावडे यांची प्रतिक्रिया मिळविण्यासाठी उपलब्ध दोन्ही फोन क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे अनेकदा प्रयत्न केले. परंतु ते ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असल्याचे दिसून येत होते.
दरम्यान, आमच्या या बातमीला दुजोरा देणारे वृत्त कालच एका डिजिटल वृत्तपत्राने प्रसिद्ध केले असून त्यात कार्यकारी संचालक श्री. गावडे यांनी स्वतःची बाजू मांडल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.