आज परिस्थिती अशी आहे की प्रत्यक्ष पोटचा मुलगा वडिलांना साहाय्य करण्यासाठी 10 वेळा विचार करतो. कोणीही कोणावर विश्वास टाकायलाच तयार नाही. तथापि, वाळवंटात पाण्याची विहीर सापडावी, तशा प्रकारे काही आशादायी उदाहरणेही सापडतात. काही भल्या व्यक्ती स्वतःचा विचार न करता परिचितांना कोणत्याही प्रकारचे साहाय्य करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
बिल सुमिएल आणि टीम लेट्स हे असेच एकमेकांचे परिचित. टिभ हे टॅक्सीचालक असून बिल हे त्याचे कायमचे ग्राहक आहेत. ते नेहमी त्यांच्या टॅक्सीतून प्रवास करतात. दोघांचा गाढ परिचय आहे. आपण नेहमी कोठे जात असता असा प्रश्न सहज म्हणून टीम यांनी बिल यांना विचारला. यावर माझे मूत्रपिंड बिघडले आहे, त्यामुळे मी डायलिसिस करण्यासाठी जात असतो, असे उत्तर बिल यांनी दिले. त्याचवेळी टीम यांनी आपले एक मूत्रपिंड बिल यांना दान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी यांनी मोबदल्याची अपेक्षाही ठेवली नाही. केवळ आपल्या जिवलग मित्राचे आयुष्य सुधारावे म्हणून त्यांनी हा त्याग करण्याची तयारी दर्शविली. आता बिल यांची प्रकृती सुधारली असून मित्राचा त्याग फळला आहे.