इनामदार, ज्युपिटर, के.एम.सी.एच रूग्णालये रडारवर
पुणे / प्रतिनिधी :
पैशांच्या आमिषाने बेकायदा अवयव प्रत्यारोपण (किडनी रॅकेट) प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत पोहोचले आहेत. वानवडीतील इनामदार हॉस्पिटल, ठाण्यातील ज्युपिटर आणि कोइम्बतूरमधील के.एम.सी.एच हॉस्पिटलमध्येही बेकायदा किडनी प्रत्यारोपण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित रूग्णालयांच्या चौकशीसाठी त्यांना इ-मेल पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली आहे.
अभिजित शशिकांत गटणे (वय ४०, रा. एरंडवणे गावठाण) आणि रवींद्र महादेव रोडगे (वय ४३, रा. लांडेवाडी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक केलेल्या एजंटांची नावे आहेत.
दोघांनी साथीदारांच्या मदतीने वानवडीतील इनामदार, कोईम्बतूरमधील के. एम. सी. एच. ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात बनावट नातेवाईक दाखवून ७ किडनी रोपण शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत. रुबी हॉस्पिटलमधील किडनी रॅकेट उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. कोल्हापूरमधील महिलेला १५ लाख रुपये देण्याच्या आमिषाने तिची फसवणूक करण्यात आली होती. त्यानुसार याप्रकरणी आता आरोपी, फिर्यादी आणि संशयित यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. रुबी हॉल क्लिनिकमध्ये बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणानंतर या रॅकेटमध्ये आणखी तीन रुग्णालयांचा सहभागामुळे खळबळ उडाली आहे. परराज्यासह राज्यातील इतर रूग्णालयातही बेकायदा किडनी रॅकेट सुरू होते का, याबाबतही पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.