ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एकाने दिली खूनाची कबुली
वेंगुर्ले/प्रतिनिधी-
वेंगुर्ला तालुक्यातील मठ- कणकेवाडी येथील सायली यशवंत गावडे या २२ वर्षीय युवतीचा मृतदेह आडेली व वेतोरा हद्दीतील एका बागेमध्ये आढळून आला आहे. सायलीच्या डोक्याच्या मागे जखम झाली असून तिच्या चेहर्यावर जखमा आणि गळयाभोवती काळा व्रण देखील दिसून आला. या प्रकरणाची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात झाल्यावर पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असताना त्यातील एका संशयिताने खूनाची कबुली दिली.
सायली हिचा मृतदेह रविवारी रात्री ११ वाजता काजूच्या बागेत वेतोरेतील एका युवकाच्या निदर्शनास आला. त्यांनतर रात्री तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी हा मृतदेह रात्री १ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
याबाबत मयत युवतीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे संशयितांविरूद्ध ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ले पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर तसेच ओरोस येथील गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस पथक पुढील तपास करत आहे.