अंतिम लढतीत नॉर्वेच्या कॅस्पर रूडवर सहज मात
वृत्तसंस्था/ पॅरिस
‘किंग ऑफ क्ले’ ही बिरुदावली पुन्हा एकदा सिद्ध करताना स्पेनच्या राफेल नदालने विक्रम वाढविताना 14 व्या वेळी फ्रेंच च ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्याने नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा सरळ सेट्सनी पराभव केला.
पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठलेल्या नॉर्वेच्या रूडवर नदालने 6-3, 6-3, 6-0 असा सहज विजय मिळविला. त्याचे हे कारकिर्दीतील 22 वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. 36 वर्षीय नदाल ही स्पर्धा जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू बनला आहे. याच वर्षी त्याने जानेवारीत झालेली ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली असून कारकिर्दीत प्रथमच त्याने एकाच वर्षात पहिल्या दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. दुसऱया सेटमध्ये रूडने 3-1 अशी आघाडी घेतली होती. पण याचमुळे प्रेरित झालेल्या नदालने शेवटचे सलग 11 गेम जिंकत त्याला अजिबात संधी दिली नाही.
19 व्या वर्षी 2005 मध्ये त्याने येथील स्पर्धेचे पहिल्यांदा जेतेपद मिळविले होते. आजवर एकाही महिला किंवा पुरुष टेनिसपटूला एकाच ग्रँडस्लॅमचे 14 वेळा जेतेपद मिळविता आलेले नाही. त्याने सर्वाधिक 22 ग्रँडस्लॅम जिंकल्या असून स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने कारकिर्दीत 20 तर सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचनेही 20 अजिंक्यपदे मिळविली आहेत. वयाचा परिणाम आणि डाव्या पायाला होत असलेल्या वेदना यामुळे त्याच्या खेळावर मर्यादा येत होत्या. तरीही त्याने या स्पर्धेत टॉप टेनमधील फेलिक्स ऑगर ऍलियासिमेला (9) चौथ्या फेरीत, अग्रमानांकित जोकोविचला उपांत्यपूर्व फेरीत, उपांत्य फेरीत तिसऱया मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हला (दुखापतीमुळे माघार घेतली) आणि शेवटी आठव्या मानांकित रूडला त्याने हरविण्याचा पराक्रम केला. या मैदानावर अंतिम फेरीतील त्याचे रेकॉर्ड 14-0 असे आहे तर या फेव्हरिट कोर्टवर त्याचे सामने जिंकण्याचे रेकॉर्ड 112-3 असे आहे. नदालने ही स्पर्धा 2005 ते 2008, 2010 ते 2014, 2017 ते 2020 यावर्षी जिंकली आहे. याशिवाय त्याने अमेरिकन ओपन चारवेळा, ऑस्ट्रेलियन ओपन व विम्बल्डन प्रत्येकी दोनवेळा जिंकली आहे.
23 वर्षीय रूड हा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच खेळत होता. यापूर्वी त्याने एकदाही ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरीही गाठली नव्हती. नदाल हा त्याचा आदर्श असून यापूर्वी येथे झालेल्या नदालचे सर्व अंतिम सामने त्याने टीव्हीवर पाहिले आहेत. विशेष म्हणजे नदालच्या मॅलोर्कामधील नदाल टेनिस अकादमीतच त्याने टेनिंग घेतले आहे. सरावावेळी दोघांनी अनेक सेट्स एकमेकाविरुद्ध खेळले आहेत आणि ते सर्वच नदालने जिंकले आहेत. असे असले तरी प्रत्यक्ष स्पर्धेत दोघांची येथे प्रथमच गाठ पडली होती.