कार्यकर्त्यांकडून व्हिडीओ व्हायरल, गणेशोत्सवात डॉल्बीला वाजणार का?
प्रतिनिधी/ सातारा
कॉलर उडवणे असो, लुंगी असो अगर राजेंनी केलेली कोणतीही ऍक्शन असो त्यावर तरुणाई फिदा होते. त्यांच्या स्टाईलचा अनुभव रविवारी रात्री तरुणांनी पुन्हा एकदा अनुभवला. माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी आणलेल्या नवीन साऊंड सिस्टीमच्या उद्घाटनप्रसंगी डॉल्बीच्या दणक्यात उदयनराजेंनी आपल्या स्टाईलने कॉलर उडवली. याचे व्हिडीओ राजे समर्थकांच्या स्टेटसवर धडाधड पडायला सुरू झाले. गणेशोत्सवात डॉल्बीला अजूनही परवानगी दिली नाही. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात डॉल्बी दणाणणार का? याबाबत चर्चांना जोर आला आहे.
खासदार उदयनराजेंच्याबाबत सर्वसामान्यांमध्ये एक आदरयुक्त भावना आहे. त्यांच्याबाबत जनतेच्या मनात प्रेम आहे. डीजेबाबत खासदार उदयनराजेंनी घेतलेली भूमिका सर्वसामान्य तळागाळातल्या सातारकरांना रुचलेली नाही. प्रशासनाने तर दोन वेळा बैठकीत डॉल्बीला परवानगी नाही असे निक्षून सांगितले. तरीही खासदार उदयनराजे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून स्वतः सातारा तालिम संघाच्या मैदानावर आयोजित दहीहंडी उत्सवात डीजेच्या तालावर सहभागी होत प्रशासनाच्या निर्णयाला कोलदांडा दिल्याचे सातारकरांनी पाहिले. त्यानंतर दुसऱयाच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या शांतता बैठकीलाही ते आले नव्हते. मात्र, तेथे सातारकर म्हणून काही नागरिकांनी डॉल्बीच्या विरोधात आपली भूमिका मांडली. आता तर माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी चक्क तब्बल एक कोटी रुपयांची साऊंड सिस्टिम खरेदी केली आहे. त्याचे उद्घाटन खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत डीजे वाजवून करण्यात आले. त्याच डीजेच्या तालावर राजेंनी आपल्या स्टाईलने कॉलर उडवली. त्यांनी कॉलर उडवल्याची स्टाईलचा व्हिडीओ साताऱयात गाजत आहे.