वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी राजपुत्र ऍन्ड्रय़ू यांच्या उपचारासाठी आलेले बिल भरण्यास नकार दिला आहे. ऍन्ड्रय़ू यांनी अनेक वर्षांपासून एका भारतीय योगीकडून उपचार चालविले आहेत. याकरता त्यांना वर्षभरात 32 लाख रुपयांचे शुल्क भरावे लागते. ऍन्ड्रय़ू हे आतापर्यंत ही रक्कम महाराणी एलिझाबेथ स्वतःच्या कमाईतून भरत होत्या. परंतु राजे चार्ल्स यांनी या खर्चाची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांनी ऍन्ड्रय़ू यांना स्वतःच हे बिल भरण्याची सूचना केली आहे.
भारतीय योगी अनेक वर्षांपासून ऍन्ड्रय़ू यांना मंत्र, मसाज आणि मेडिटेशनद्वारे थेरपी देत आहे. याकरता हा योगी ऍन्ड्रय़ू याच्या रॉयल लॉजयुक्त घरात सुमारे महिन्याभरासाठी वास्तव्य करतो. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एलिझाबेथ यांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी एलिझाबेथ यांच्याकडूनच हा खर्च उचलला जात होता. ब्रिटनच्या मोनार्कच्या स्टेट डची ऑफ लॅनकेस्टरमधून प्राप्त होणाऱया कमाईतून ही रक्कम दिली जात होती. परंतु ब्रिटनमध्ये वाढती महागाई पाहता राजे चार्ल्स यांनी हा खर्च न उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
याचबरोबर राजे चार्ल्स हे ऍन्ड्रय़ू यांच्या 2 कोटी 49 लाख रुपयांच्या वार्षिक वेतनालाही स्थगिती देऊ शकतात. हे वेतन ऍन्ड्रय़ू यांना डची ऑफ लॅनकेस्टरमधून देण्यात येते. काही दिवसांपूर्वी ऍन्ड्रय़ू यांना स्वतःचे घर रॉयल लॉज रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. ऍन्ड्रय़ू हे आता राजपुत्र हॅरी यांचे निवासस्थान फ्रॉगमोर कॉटेजमध्ये राहणार आहेत. या निवासस्थानात यापूर्वी राजपुत्र हॅरी-मेगन मर्केल यांचे वास्तव्य होते.