पुणे / प्रतिनिधी :
कोणत्याही खेळासाठी प्रावीण्य मिळविण्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावीच लागते. मेहनत आणि सर्वांचे मिळालेले पाठबळ यांच्या जोरावरच आज पर्यंतचा प्रवास करू शकले, अशा शब्दांत वरिष्ठ महिलांच्या इंग्लंड येथे होणाऱ्या टी-20 दौऱ्यासाठी निवड झालेल्या पुण्यातील आझम स्पोर्टस अकादमीच्या किरण नवगिरे यांनी सोमवारी आपला प्रवास उलगडला.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख यांच्या वतीने गौरविण्यात आले. किरण नवगिरे म्हणाल्या, विविध स्पर्धांमध्ये खेळताना चांगला अनुभव मिळाला. या स्पर्धांमध्ये खेळताना मी माझा नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजीचा सराव करण्याबरोबरच सातत्याने फिटनेसकडे देखील लक्ष दिले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख म्हणाले, गेल्या 4 वर्षांपासून किरण आझम स्पोर्ट्स अकादमीमध्ये सराव करते. ती गुणवान खेळाडू असल्याने तिला सर्वच सुविधा अकादमीच्या माध्यमातून पुरविण्यात येत येतात. मुलींनी देखील खेळाच्या विश्वात आपले नाव कोरण्यासाठी आझम स्पोर्ट्स अकादमी गुणवान खेळाडूंच्या मागे नेहमीच खंबीरपणे उभी आहे.
आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख म्हणाले, खेळातील जिद्द पाहून किरणची निवड करण्यात आली. किरणसाठी डाएट, फिटनेस यासाठी किरणच्या बरोबरीने आम्ही देखील मेहनत घेत होतो. किरण करत असलेल्या मेहनतीमुळे तिची आज भारतीय संघात निवड करण्यात आली असल्याचा आनंद होत आहे. इंग्लंडमधील खेळपट्टय़ांवर किरणची आक्रमक फलंदाजी ही भारतीय संघाला फायदेशीर ठरणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे.
हेही वाचा : शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तरसूची जाहीर