ऑनलाईन टीम / मुंबई :
आयएनएस विक्रांत (Ins vikrant) वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) आणि त्यांचा पुत्र नील सोमय्यावर (neel somaiya) आहे. सोमवारी याप्रकरणातील किरीट सोमय्या यांचा जामीनअर्ज फेटाळल्यानंतर सोमय्या पिता-पुत्र सध्या नॉट रिचेबल आहेत. सोमय्या पिता-पुत्रांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमय्या यांच्या मुलुंड परिसरातील कार्यालयाबाहेरच्या रस्त्यावर अज्ञातांनी ”भाग सोमय्या भाग” असा संदेश लिहिला आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी पांढरा रंग मारुन हा संदेश खोडण्याचा प्रयत्न केला.
दोन दिवसांपासून सोमय्या पिता-पुत्र अज्ञातवासात आहेत. सोमय्यांचा ठावठिकाणा राज्याच्या गृह विभागालाही माहीत नाही. याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री सोमय्यांच्या मुलुंडमधील कार्यालयाबाहेर काही अज्ञातांनी ”भाग सोमय्या भाग” अशी वाक्य लिहिली होती. त्यानंतर पोलिसांनी ही वाक्य पाढऱ्या रंगाच्या सहाय्यानं खोडण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या आणि शिवसेनेत रंगलेला कलगीतुरा पाहता हे कृत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान हे कृत्य नेमकं कोणी केलं याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे.