ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे श्री जी होम्स या कंपनीत भागीदार आहेत. या कंपनीकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेल्या इमारतीसाठी काळ्या पैशांचा वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पातील 29.62 कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून कंपनीत आले आहेत. त्यासाठी पाटणकर यांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची मदत घेतली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांचे चतुर्वेदी याच्याशी संबंध असून, चतुर्वेदीचे आदित्य आणि तेजस ठाकरेंसोबत अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मेहुण्याच्या कंपनीसोबत काय संबंध आहे, हे जाहीर करावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले, श्रीधर पाटणकर हे भागीदार असलेल्या श्री जी होम्स संबंधित बांधकाम प्रकल्पात काळ्या पैशाचा वापर केला गेला आहे. कोटय़वधींची मालमत्ता असलेल्या या इमारतीच्या बांधकाम प्रकल्पासाठी श्रीधर पाटणकर यांचा काळा पैसा वापरण्यात आला. या प्रकल्पातील 29 कोटी 62 लाख 29 हजार 320 रुपये हे आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून कंपनीत आले आहेत. त्यासाठी श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची मदत घेतली होती. हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याच्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी कोटय़वधींचे व्यवहार केले आहेत. कोमो स्टॉक्स या कंपनीच्या माध्यमातून 7 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला.
त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री जी होम्स या कंपनीशी आपला काय संबंध आहे, हे जाहीर करावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.